शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कारवाई करा; हसन मुश्रीफांचा आदेश

  मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे मुख्याध्यापक पदोन्नती, विषय शिक्षक नकार, विज्ञान शिक्षकांच्या नियुक्ती यासह अनेक प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना दूरध्वनीवरून दिल्याची माहिती सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस बब्रुवाहन काशीद यांनी दिली.

  शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक नेते मोहन भोसले, राज्य संघाचे माजी सरचिटणीस एन वाय पाटील, बब्रुवाहन काशीद, कोल्हापूर जिल्ह्याचे कोषाध्यक्ष वरून चाळके यांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात मुश्रीफ यांची कोल्हापूर येथे नुकतीच भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

  तीन वर्षांपूर्वी शिक्षक संघाच्या आमरण उपोषणासह केलेल्या तीव्र आंदोलनानंतर जिल्हा परिषदेने १६९ मुख्याध्यापकांची पदोन्नती केली होती. गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालावधीमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मुख्याध्यापक पदोन्नती शासन आदेशाप्रमाणे विज्ञान शिक्षक नियुक्ती, विषय शिक्षक नकार या प्रक्रिया सुरळीतपणे पार पडूनही शिक्षण विभागाची अकार्यक्षमता आणि वेळकाढू धोरणामुळे सोलापूर जिल्ह्यात ही प्रक्रिया राबविली गेली नाही. शिक्षक संघाच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची बदली होऊनही शिक्षकांचे प्रश्न जसेच्या तसेच प्रलंबित आहेत. ही बाब शिष्टमंडळाने मंत्रिमहोदयांच्या निदर्शनास आणून दिली.

  ग्रामविकास मंत्र्यांसोबत रँडम व विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या बदल्या, केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे शिक्षकातून अभावितपणे भरणे. कोरोनामुळे मयत शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्यांना अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेणे, चालू वर्षी बदलीपात्र सेवाज्येष्ठता ही ३१ मे ऐवजी ३० जून धरण्यात यावी, सर्वसाधारण क्षेत्रातील सेवा ही पाच वर्षांऐवजी तीन वर्षे करावी. राज्यातील शिक्षकांचा पगार दरमहा एक तारखेला होण्यासाठी सीएमपी प्रणाली लागू करावी या प्रश्नांवरही चर्चा झाली.

  यावेळी माळशिरस तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप ताटे, लोकनेते बाबुराव पाटील, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन रणजित थिटे, वैभव चव्हाण आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

  सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अकार्यक्षम आणि चालढकल धोरणामुळे अनेक शिक्षक पदोन्नतीअभावी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्याचे दीर्घकालीन आर्थिक नुकसान झाले. मंत्रीमहोदयांच्या आदेशानंतर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे.

  – मच्छिंद्रनाथ मोरे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ सोलापूर