ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; दिलीप स्वामी यांच्या सूचना

  सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी वेबेक्स मीटिंगद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणांबाबत सविस्तर माहिती दिली.

  ग्राम सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करते. ही यंत्रणा वापरून नागरिक आपत्कालीन परिस्थितीत कशा पद्धतीने मदत मिळवू शकतात. आजपर्यंत नाशिक, सातारा, पुणे व अहमदनगर या जिल्ह्यात ही यंत्रणा यशस्वी रित्या कार्यान्वित झाली असून, कित्येक संभाव्य दरोडे यामुळे टळले असून, अनेक दरोडेखोरांना दरोड्याआधीच पकडणे या यंत्रणेमुळे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे गतवर्षी नाशिक जिल्ह्यात पुर परिस्थितीत अनेक नागरीकांना वेळेत मदत करणे प्रशासनास शक्य झाले आहे, अशी माहिती सातपुते यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे सीईओ दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेऊन या व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले.

  या वेबेक्स मिटींगमध्ये प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड, सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

  यावेळी हा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थी रूपये 50 प्रमाणे प्रतिवर्ष शुल्क आकारण्यात येणार आहे. सदरचे शुल्क ग्रामनिधी/वित्त आयोग/लोकसहभाग या माध्यमातून हे शुल्क भरून तीन महिन्यांच्या आत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करा.

  • पहिल्या टप्प्यात छोटी व निधीची अडचण नसणारी गावे तातडीने पूर्ण करा.
  • दुसऱ्या टप्प्यात मोठी व निधीची अडचण असणारी गावे निधीची तरतूद करुन पूर्ण करा.
  • गटविकास अधिकाऱ्यांसह गटशिक्षणाधिकारी यांनी तातडीने सुयोग्य नियोजन करून यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत गावोगावी भेटी द्या. जनजागृती करा अशा सूचना यावेळी सीईओ स्वामी यांनी दिल्या.