कोरोनाची तिसऱ्या लाटेत लहान मुलांचे आजार प्रतिबंधाबाबत उपाययोजना करा ; सीईओ स्वामी यांनी घेतली बैठक

कोविड बाधीत बालकांना द्यावयाच्या उपचारा संदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे तसेच यासंदर्भात तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना यावेळी स्वामी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.गाव पातळीवर तिसऱ्या लाटेच्या धोक्या संदर्भात व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. मिशन इंद्रधनुषच्या धर्तीवर वंचित बालकांची यादी तयार करून आढावा घेण्यात यावा. Influenza vaccine बाबत state task force मध्ये निर्णय झाल्यास या प्रमाणात बालकांचा लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्याबाबत तयारी सुरू करण्यात यावी.

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व या लाटेत लहान मुलांना धोका असल्याबाबत तज्ञांनी इशारा दिलेला आहे. कोरोनाच्या या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पुर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर सीईओ स्वामी यांनी जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात तज्ञ डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. वैशाली शिरशेट्टी अध्यक्ष भारतीय बालरोग तज्ज्ञ असोसिएशन, डॉ. मंजुषा चाफळकर सोलापूर बालरोग तज्ज्ञ संघटना, डॉ. एस.व्ही. सावरकर बालरोग विभाग प्रमुख डॉ.वैश्यंपायन वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर, डॉ. मोहन शेगर निवासी वैद्यकीय अधिकारी सोलापूर, डॉ. एस.व्ही.सोनवणे वैद्यकीय अधिकारी जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्र, सोलापूर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे आदी उपस्थित होते.

    यावेळी कुपोषित बालकांची यादी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम कार्यालयाकडे आहे त्यानुसार या बालकांचे नियमित लसीकरण करून घ्यावे.जून महिन्यापासून ० ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आजारी बालकांना दवाखान्यात तातडीने दाखल करण्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था बळकट करण्याची कार्यवाही करावी. कुशल मनुष्यबळ विकास अंतर्गत आशा स्वयंसेविका यांना पॅरामेडिकल कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात यावे.

    4D स्क्रिनिंग आपण करतोच आहोत त्याचा डाटा अपडेट करणे आवश्यक आहे. टार्गेट ग्रुप निश्चित करून त्याप्रमाणे बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात. नियमित लसीकरणाचे कमी झालेले प्रमाण वाढवण्यात यावे. ज्या ठिकाणी बालकांची वस्तीगृह आहेत तेथील कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कोविड लसीकरण करून घ्यावे जेणेकरून बालकांना कोरोना संसर्गाचा धोका कमी होईल. ग्रामीण भागातील बालरोगतज्ञांची माहिती घेऊन त्यांना कोविड उपाययोजनांमध्ये काम करण्यास प्रवृत्त करण्यात यावे. बालकांसाठी विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात यावी.

    कोविड बाधीत बालकांना द्यावयाच्या उपचारा संदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे तसेच यासंदर्भात तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना यावेळी स्वामी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.गाव पातळीवर तिसऱ्या लाटेच्या धोक्या संदर्भात व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. मिशन इंद्रधनुषच्या धर्तीवर वंचित बालकांची यादी तयार करून आढावा घेण्यात यावा. Influenza vaccine बाबत state task force मध्ये निर्णय झाल्यास या प्रमाणात बालकांचा लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्याबाबत तयारी सुरू करण्यात यावी. वरील मुद्द्यांवर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सीईओ स्वामी यांनी उपस्थित तज्ञांचे मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानले.