पती घरात नसल्याचा फायदा घेत अपंग महिलेवर घरमालकाने केला बलात्कार; टेंभुर्णीतील घटना

    टेंभुर्णी : माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे अपंग महिलेवर घरमालक तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घरमालकाने पीडितेवर तीन महिने सतत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली जात आहे.

    याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे की, माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे पीडित  महिला आपल्या पती व मुलासह आरोपी घर मालक याच्याकडे गेल्या आठ महिन्यांपासून घर भाड्याने राहत होती. महिलेचे पती मजुरी करून घराचा उदरनिर्वाह चालवत होते. पीडित महिला घर भाड्याने राहण्यास आल्यानंतर दोन महिन्यानंतर आरोपी पीडित महिलेकडे पाहून खाणाखुणा करून, हसू लागला इशारे करू लागला. मात्र, तो घरमालक असल्याने पीडितेने त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर गेल्या एप्रिल महिन्यामध्ये पीडित महिला रात्री जेवण करून आराम करीत असताना पीडितेचा पती बाहेर गेल्याचे पाहून आरोपी घरमालक पीडितेला शरीरसुखाची मागणी करून जबरदस्ती करू लागला.

    पीडितेने त्याच्याकडे मी अपंग आहे, माझे पती मला नांदवणार नाहीत, अशी विनवणी केल्यानंतरही आरोपीने जबरदस्तीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले व तो तेथून निघून गेला. त्यानंतर सुमारे रात्री बारा वाजता पीडितेचे पती घरी आला. मात्र, घाबरून पीडितेने पतीला काही सांगितले नाही. त्यानंतर वारंवार महिलेचा पती व मुलगा घरी नसल्याची संधी साधत महिलेवर लैंगिक अत्याचार केले. नंतर १९ जून रोजी महिलेचे पती कामावर गेला असताना पीडित महिला एकटीच घरी असताना नेहमीप्रमाणे घरात येऊन आरोपीने पुन्हा तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करत असताना अचानक पीडित महिलेचा पती त्या ठिकाणी आला.

    घरमालक पत्नीवर अत्याचार करत असल्याचे पाहून पीडितेच्या पतीने आरोपी घरमालकाच्या कानशिलात लगावत शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी मोठ्या मोठ्याने आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही जमा झाले. तसेच आरोपीची पत्नी त्याठिकाणी आली. त्यानंतर पीडित महिला घाबरून रविवारी माहेरी गेली. नंतर आईसोबत येऊन पीडितेने 29 जून रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात घर मालकाविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून सतत लैंगिक अत्याचार करत असल्याची फिर्याद दिली.

    पीडितेच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलिसांनी संशयित आरोपी घर मालक पप्पू चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली. त्यास न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील जाधव करीत आहेत.