पुढची संपूर्ण पिढी घडवण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्येच : सीईओ स्वामी

  सोलापूर : सर्व शाळा मंगळवार (दि.१५) सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर सीईओ स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांसमवेत व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाइन संवाद साधला. वेबेक्स मीट व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिक्षकांशी संवाद साधताना सीईओ स्वामी बोलत होते. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड व माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर उपस्थित होते.

  शिक्षकांना आदराने “गुरुजी” म्हणून संबोधण्याची आपली भारतीय परंपरा आहे. “गु” म्हणजे अंधकार आणि “रू” म्हणजे प्रकाश. या अर्थाने गुरुजी म्हणजे विद्यार्थ्यांना अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी व्यक्ती. शिक्षकांनी मन लावून काम केले तर शिक्षक पुढची अवघी पिढी घडवू शकतो एवढे सामर्थ्य शिक्षकांमध्ये आहे. तेव्हा शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे पूर्णपणे मन लावून लक्ष देणे गरजेचे आहे. सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले अशी शिक्षकांची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभलेली असून या परंपरेला छेद जाईल असे कोणतेही वर्तन शिक्षकांकडून अपेक्षित नाही.

  शिक्षकांच्या जिल्हास्तरावरील बहुतांशी मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि उर्वरित मागण्याही मान्य करीत आहे. तेव्हा शिक्षकांनी ज्ञानार्जनाचे काम सोडून मुख्यालयामध्ये वेळ वाया घालवू नये, अशी मी सर्वांना विनंती करतो. यावेळी शिक्षण विभागातील अधिकारी व सर्व शिक्षकवृंदांना सीईओ स्वामी यांनी खालील सूचना दिल्या.

  रोजगार हमी योजनेतून शाळेच्या सौंदर्यीकरणाची ३३०० कामे मी मंजूर केली आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी ही कामे सुरू झालेली नाहीत. तरी तात्काळ कामे सुरू करण्यात यावी. “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी करून घेण्याच्या कामी सर्व ते प्रयत्न शिक्षकांकडून केले जावे. शिक्षकांनी कोविडच्या या कालावधीत स्वतःचे आरोग्य तर जपायचे आहेच. त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुद्धा जपण्याचे कार्य शिक्षकांना करावयाचे आहे.

  शिक्षण विभागातील सर्व अधिकारी आणि शिक्षक यांच्यातील संबंध हे जिव्हाळ्याचे असणे गरजेचे आहे. सर्वांनी तीन “स” पद्धतीने आपले कामकाज करावे. पहिला स म्हणजे सकारात्मकता, दुसरा स हा समन्वयाचा असून तिसरा स समाधानाचा आहे. सकारात्मकता, एकमेकांमध्ये समन्वय साधून काम केले तर शेवटी समाधानाच मिळणार आहे. शिक्षकांनी नियमित गृहभेटी द्याव्यात पालकांशी संपर्क वाढवावा. ग्राम शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती व पालक समिती कार्यान्वित कराव्यात. सगुन पोर्टलवर काम कमी आहे ते वाढवावे त्याचप्रमाणे दिशा ॲप, स्टडी ॲप यावरही काम करणे आवश्यक आहे.

  मागील वर्षी स्वाध्यायमध्ये सोलापूर जिल्हा क्रमांक एकवर होता. असेच काम प्रत्येक ॲपवर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे तुमचे, शिक्षण विभागाचे आणि पर्यायाने सोलापूर जिल्ह्याचे नाव मोठे होणार आहे. शिक्षकांनी स्वतःचे ज्ञान अद्ययावत करावे.‌ चालू घडामोडी. नवनवीन संशोधन याबाबत आपले ज्ञान अद्ययावत करून विद्यार्थ्यांना याचे ज्ञान करून दिल्यास आपले विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत कुठेही कमी पडणार नाहीत याची मला खात्री आहे. शाळा समृद्धीचे काम हे काम न ठेवता ती एक चळवळ बनावी. शाळा समृद्ध झाली तर विद्यार्थी समृद्ध होईल आणि आपला जिल्हा समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही याची जाणीव प्रत्येक क्षणी बाळगावी. गुणवत्तेचा ध्यास घेऊन आपल्याला यापुढे दूरदृष्टीने काम करायचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी केले तर आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी मानले.