‘नवराष्ट्र’चा दणका; ‘त्या’ शिक्षकाची बदली अखेर रद्द

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील बेकायदेशीर शिक्षक बदली रद्द करण्यात आली आहे. दैनिक ‘नवराष्ट्र’ने शिक्षक बदली बेकायदेशीर असल्याचे वृत्तांकन करून लक्षवेधी केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नवराष्ट्र वृत्ताची दखल घेत त्या शिक्षकाची बदली रद्द केली आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांना जोरदार दणका बसला आहे.

    याबाबत माहिती अशी की, संजय कुमार राठोड यांनी मर्जीतील एस. पी. चव्हाण या उपशिक्षकाला अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव पाटील वस्ती प्राथमिक शाळेतून उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमान्य नगर येथे शिक्षण समिती सभेच्या 2019 सालातील ठराव दाखवून सोयीनुसार बदली केली होती. त्यामुळे तेथील कार्यरत असलेल्या शिक्षकांना सरप्लस होण्याची वेळ आली होती. मर्जीतील शिक्षकाची नियुक्ती नेहरू वसतिगृह येथे देण्यात आली होती.

    वास्तविक गेल्या वीस वर्षांपासून एस पी चव्हाण हे शिक्षक अधीक्षकपदावर अतिरिक्त भार सांभाळून काम करण्याचे दाखवण्यात आले होते. या बेकायदेशीर बदलीसंदर्भात राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले आणि जुनी पेन्शन शिक्षक संघटनेने न्याय देण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांची पटसंख्या ही बोगस दाखवून मर्जीतील शिक्षकाची नियुक्ती देण्यात आली होती.

    दिलीप स्वामी यांची दिशाभूल झाल्याचे निर्देशनास येताच दिलीप स्वामी यांनी ही बदली रद्द केली आहे .
    शिक्षक संघटनेकडून नवराष्ट्रचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.