चक्क पोलिस चौकीतच साजरा केला खासगी सावकाराचा वाढदिवस

  संग्रामनगर : अकलुज शहर पोलीस चौकीतच एका खासगी सावकाराचा वाढदिवस पोलीस कर्मचाऱ्यांनीच धुमधडाक्यात साजरा केला. त्यामुळे कायद्याच्या रक्षकांनीच कायदा धाब्यावर बसवल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सबळ पुराव्यासह महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेने सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केल्याची माहिती जनसेवा संघटनेकडून देण्यात आली.

  याबाबत जनसेवा संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा व अकलुज ग्रामपंचायतीच्या सदश्या जोती कुंभार यांनी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांना दिलेल्या लेखी निवेदनात तक्रार केली. अकलूज शहर पोलीस चौकीत पिंटू चौगुले या व्यक्तीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस साजरा करताना फौजदार निकम, गुन्हा प्रकटीकरण शाखेचे सुहास क्षीरसागर, चौधरी, अनंतपुरे असे पोलीस कर्मचारी, खासगी सावकार तसेच गावगुंड उपस्थित होते.

  पोलिस चौकीच्या आवारात पिंटू चौगुलेचा वाढदिवस साजरा करायला चौगुले हा पोलीस आहे का नेता आहे असा सवाल उपस्थित केला आहे. तर पोलीस चौकी म्हणजे धर्मशाळा आहे की शासकीय कार्यालय असा झणझणीत प्रश्न निवेदनाद्वारे ऊपस्थित केला आहे. तसेच शहर पोलीस पोलीस चौकी म्हणजे अकलुजमध्ये गावगुंड व खासगी सावकाराच्या बसण्या-उठण्याचा अड्डा बनला आहे.

  वरिष्ठांकडे तक्रार करा

  या प्रकाराबाबत अकलुज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांना माहिती दिली असता याबाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार करा, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार जनसेवा संघटनेच्या वतीने तेजस्विनी सातपुते यांच्याकडे लेखी तक्रार करुन सदर तक्रारीची प्रत अकलुजचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांनाही देण्यात आली आहे.

  पोलिसांकडून नियमभंग चालतो का?

  कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस चौकीतच एका खासगी सावकाराचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला आहे. कोरोनाबाबतचे नियम हे फक्त जनतेसाठीच आहेत का? पोलिसांनी नियम मोडले तर चालतात का? असा सवालही उपस्थित होत आहे.

  पालखीच्या कट्यावर केक कापल्याने गुन्हा

  काही दिवसांपूर्वीच वाखरी येथे पालखीच्या कट्यावर केक कापल्यामुळे संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तर वेळापूर येथेही चौकात केक कापल्यामुळे संबंधितावर कारवाई व सहभागी पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

  पैसे न दिल्यास मारहाण, घर ताब्यात घेण्याचे प्रकार

  अकलुज शहर पोलीस चौकीत पिंटू चौगुले या खासगी सावकारी करणाऱ्या गावगुंडाचा वाढदिवस पोलिसांनी धुमधडाक्यात साजरा केला. हा सावकार मोठ्या व्याजाने पैसे देऊन लोकांची लूट करत आहे. मागेल तेवढे व्याज नाही दिले तर लोकांना मारहाण करणे, त्याच्या घरातील सामान उचलून आणणे, लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून घर ताब्यात घेणं अशी बेकायदेशीर कृत्य करत असतो.

  पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करावी

  जुने पोलीस ठाणे म्हणजेच आत्ताची शहर चौकी. काही दिवसांपूर्वीच दुरुस्ती रंगरंगोटी करुन सुशोभीकरण करण्यात आले. हा खर्च लोकवर्गणीतून केल्याचे सांगितले जाते. मात्र, यासाठी खासगी सावकार, दोन नंबर धंदेवाले यांच्याकडून पैसे घेऊन काम  करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पिंटू चौगुले यानेही या कामात पोलिसांना चांगली वर्गणी दिल्याचे समजते. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी यावर करावी, अशी मागणी केली जात आहे.