पंढरपूरच्या तोंडचे पाणी चोरणारी बारामतीची मंडळी ; खा. रणजितसिंह निंबाळकर यांची टीका

भारतीय जनता पक्षाने कोरोनाच्या काळात ही निवडणूक लागू नये, बिनविरोध व्हावी, यासाठी प्रशांत परिचारक यांच्यामार्फत, राष्ट्रवादीची उमेदवारी जयश्री भालके यांना द्यावी, असा प्रस्ताव पाठवला होता. मात्र राष्ट्रवादीला भावना समजल्या नाहीत. २०१४ पूर्वी व नंतर पंढरपूर तालुक्यांमध्ये अमुलाग्र बदल घडला आहे. या शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने १८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

    पंढरपूर : भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंढरपूरमध्ये आलेले माढ्याचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, ज्यांनी नीरा-देवघरचे पंढरपूरच्या हक्काचे पाणी बारामतीला पळवले, ते पाणीचोर मंगळवेढ्यातील पस्तीस गावाला काय पाणी देणार, अशी जळजळीत टीका केली.

    यावेळी खा. निंबाळकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने कोरोनाच्या काळात ही निवडणूक लागू नये, बिनविरोध व्हावी, यासाठी प्रशांत परिचारक यांच्यामार्फत, राष्ट्रवादीची उमेदवारी जयश्री भालके यांना द्यावी, असा प्रस्ताव पाठवला होता. मात्र राष्ट्रवादीला भावना समजल्या नाहीत. २०१४ पूर्वी व नंतर पंढरपूर तालुक्यांमध्ये अमुलाग्र बदल घडला आहे. या शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने १८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी केंद्र शासनाने नदीजोड प्रकल्प प्रस्ताव तयार करून राज्य सरकारला पाठवला होता. मात्र त्याचा पाठपुरावा केला गेला नाही. केंद्र शासनाने यावर स्मरण पत्र दिले तरी त्याला उत्तर दिले गेले नाही.

    निवडणुकांची घोषणा जेव्हा होते, तेव्हा ह्या पस्तीस गावचा प्रश्न पुढे येतो. पंढरपूर मंगळवेढ्याला नीरा-देवघरचे पाणी मिळावे, यासाठी भारतनाना भालके व मी स्वतः जातीने गोव्याला गेलो होतो आणि त्या फाइलवर रात्री बारा वाजता राज्यपालांची सही मिळवली होती. आता निवडणुका आल्यावर नीरा-देवघर मधून दोन टीएमसी पाणी सोडणार म्हणून केवळ घोषणा केल्या जात आहे. ज्येष्ठ पाणी तज्ञ बारामतीकर यांनी नीरा-देवघर चे पाणी बारामतीला पळवले. हे तर पाणी चोर आहेत.एखाद्याच्या मृत्यूचे भांडवल करणे चुकीचे आहे. माढ्यामधून शरद पवारांना परत पाठवले होते. आता पंढरपूर मंगळवेढ्याचे लोक चूक करणार नाहीत. हे राष्ट्रवादीचे पार्सल पुन्हा परत पाठवले जाणार आहे. त्यासाठी जनतेने भाजपला मतदान करावे.