सोलापूरकरांच्या संकटात जिल्हा प्रशासन २४ तास कार्यरत ; जिल्हाधिकारी करतात २४ तास काम

- पहाटेची छोटी डुलकी अन पुन्हा कोरोनाग्रस्तांसाठी धावपळ

    सोलापूर : कोरोना संसर्ग आणि त्याला अटोक्यात आणणारी यंत्रणा याविषयी चविष्ठ चर्चा सुरु असतात. भावनेच्या भरात प्रशासनाच्या नावे बोटे मोडणे सोप्पे आहे. परंतु प्रत्यक्ष प्रशासन काय करते. हे कोणाला ठाऊक आहे का? आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर हे चोवीस तास या संकटसमयी लोकांच्यासाठी धडपड करतायेत. यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. परंतु हे खरे आहे. कडक निर्बंधातून प्रवेश मिळविलाच तर जिल्हाधिकारी कार्यालय गाठा. बाहेर कलेक्टरांची गाडी दिसेलच. पहाटेच्या दरम्यान, ‘शिवदर्शन’ या बंगल्यातल्या कार्यालयात कलेक्टर कोणाशी तर बोलतच आहेत. हेच चित्र दिसेल. परंतु दुदैव असे कि हे पडद्यामागील चित्रण सर्वसामान्यांना दिसत नाही.

    गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण देशासह सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाने मुक्काम ठोकलेला आहे. कोरोना संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी लावल्या जाणाऱ्या कडक निर्बंधामुळे जनता आणि प्रशासन यातील संघर्ष कुठेतरी उफाळून येताना दिसून येईल. परंतु कोरोनाचे संकट रोखणे केवळ प्रशासनाच्या हाती नाहीच. विविध पातळ्यांवर दिलेली जबाबदारी. त्यावरील नियंत्रण याकडे पाहताना नागरी कर्तव्य देखील पहावे लागतात. या कर्तव्यांमध्ये कसूर झाल्याचे कळातच यंत्रणा दंडात्मक कारवाई करते. आणि त्याचा रागही जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागतो. रोष… राग… अन संताप समजून घेत निर्बंधांचा अंमल करणे आणि कोरोना रोखणे अशा सर्वस्व पातळ्यांवर एकमेव योध्दा दिसेल लढताना. त्यांचे नाव मिलींद शंभरकर. आडनाव शंभरकर असले तरी शंभरपेक्षा अधिक जबाबदाऱ्या. शंभरपेक्षा अधिक घटक यांच्याशी नीत्य संपर्कात राहून हा माणूस दोनवेळा कोरोनावार मात करुन यशस्वीपणे पुन्हा सोलापूर जिल्हावासियांच्या सेवेत आला. सकाळी नऊ वाजल्यापासूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाचा धडका सुरु होतो. तो पहाटे १ ते दोन वाजेपर्यंत सुरुच असतो. दिवस कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या समस्या जाणून घेणे. विविध विषयांवरील बैठका घेणे. मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभाग घेणे हा जिल्हाधिकाऱ्यांचा दैनंदीन कार्यक्रम रात्री सात वाजेपर्यंत सुरुच असतो. रात्री आठ वाजल्यापासून पुन्हा शिवदर्शन बंगल्यातील कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरचा आढावा. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी दिवसभरात काय काम केले. कोरोनाची स्थिती, विकासकामांचा आढावा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा घेणे. राहीलेल्या फाईंल्सवर सह्या करणे. हा दैनंदीन कार्यक्रम रात्री १ ते २ वाजेपर्यंत सुरुच असतो. पहाटेच्यावेळी एक छोटीसी डुलकी घेऊन पुन्हा सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी सोलापूरकरांच्या सेवेसाठी हजरच असतात.

    पोस्ट कोवीड हे भयंकर संकट असते. ज्यांना ही बाधा झाली. त्या सर्वांना त्याची माहिती आहेच. दुसरे कोणी अधिकारी या जागेवर असते तर त्यांनी स्वेच्छा निवृत्तीच घेतली असती. कारण, शंभरकरांच्या निवृत्तीलाही अवघे काही महिनेच उरलेले आहेत. परंतु हा माणूस अविरत लढतोच आहे. कोरोनाशी दोन हात करतोच आहे. कोरोनाशी लढतोच आहे. येतील त्यांच्याशी बोलतो आहे. आणि वरिष्ठ पातळीवर देखील उत्तरे देतच आहे. स्वत:च्या कुटूंबाकडे जेमतेमच लक्ष देणाऱ्या जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी कोरोना आल्यापासून सुट्टीच घेतली नाही. यावरदेखील कोणाचा विश्वास बसणार नाही. दोनवेळा कोरोनाची बाधा झाली असतानाही अंथरुणातून कागदावर सह्या करण्याचे काम त्यांनी सोडलेले नाही. अशा या अधिकाऱ्याची ही छोटीशीच कथा.

    हे ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दिमतीला

    जिल्हा प्रशासनातील प्रत्येक अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत काम करतोच आहे. पण, दिवसभर आणि पहाटेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांसोबत न थकता काही लोक काम करतात. त्यात त्यांचे स्वीय सहाय्यक शंकर कांबळे. प्रदिप शिंदे, शिपाई रमेश माळी आणि विनायक चव्हाण हे रात्री उशीरापर्यंत थांबून जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात.