…तर होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र सरकार जबाबदार; शितलदेवी मोहिते-पाटील यांचा इशारा

    अकलूज : गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. आंदोलन आक्रमक होऊ नये म्हणून आम्ही आत्तापर्यंत पुरुषांना थोपवले. पण आता महिलाच शांत बसणार नाहीत. महिलांची आक्रमकता सरकारला महागात पडेल आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामास सर्वस्वी महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा जि. प. सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

    अकलूज माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी तीनही गावच्या नागरिकांच्या वतीने दिनांक २२ जून पासून साखळी उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा तेरावा दिवस उजाडला तरी शासन आंदोलनाची दखल घेत नसल्याबाबत खंत व्यक्त करतानाच शितलदेवी मोहिते-पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जि. प. सदस्या सुनंदा फुले, पं. स. सदस्या हसीना शेख, हेमलता चांडोले, अकलूजच्या सरपंच पायल मोरे, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, माजी पं.स.सदस्या फातिमा पाटावाला, ग्रा.पं. सदस्या रेश्मा गायकवाड, रेश्मा तांबोळी, कविता शिवरकर, ज्योती फुले, संजय साठे, कासिम तांबोळी, उत्कर्ष शेटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

    शितलदेवी पुढे बोलताना म्हणाल्या, तीनही गावची पुरुष मंडळी सरकार विरोधात प्रचंड आक्रमक झाली असताना आजवर महिलांनी त्यांना थोपवून ठेवले आहे. परंतु आता महिलांचाही संयम सुटत चालला आहे. नुकताच उपोषणकर्त्यांकडून सरकारचा दहावा घालुन आज तेरावा घालण्यात आला तरी सरकारला जाग येत नाही. आता हे सरकार काय मासिक श्राद्ध घालायची वाट बघतोय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आज आंदोलनकर्त्यांनी सरकारचा तेरावा घालत निषेध केला. प्रतिकात्मक पुतळ्यास पुरणपोळीचे गोडाचे जेवण चारून प्रचंड घोषणा देण्यात आल्या.