गाईच्या दुधाला शासनाने प्रतिलिटर ५० रुपये हमीभाव द्यावा; मनसेची मागणी

    करमाळा : तालुक्यातील शेतकरी जोडधंदा म्हणून जर्सी गाईचे पालन करून आपली उपजीविका करत आहेत. शेती माल कवडीमोल किंमतीने विकावा लागत आहे, कुठल्याही प्रकारच्या भावाची खात्री नाही. सध्या उपलब्ध असणारा कांदा कवडीमोल किंमतीने विकावा लागत आहे. तसेच गाईच्या दुधाला शासनाने प्रति लिटर ५० रुपये हमी भाव द्यावा, अशी मागणी मनसेचे करमाळा तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी केली.

    एकीकडे पेट्रोलचे भाव, खाद्य तेलाचे भाव, डिझेलचे भाव, किराणा मालाचे भाव,खुरकाचे भाव गगनाला भिडले आहेत. दूध मात्र अठरा रुपये प्रति लिटर प्रमाणे विकावे लागत आहे. महाआघाडी सरकारच्या काळात प्रत्येक मंत्री महोदयांनी याचा अंदाज घेणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याची बाटली वीस रुपये व दूध मात्र अठरा रुपये म्हणजे दुधापेक्षा पाणी महाग झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याचा शासनाने गंभीरपणे विचार करावा अन्यथा मनसे विचार करण्यास भाग पाडेल, असा इशाराही संजय घोलप यांनी दिला.

    कोरोना महामारीवरून महागाईचा कहर यातून शेतकरी होरपळून निघाला आहे. सध्या पेरणीचे दिवस असून, शेतकरी पैशासाठी दारोदार भटकत आहे. काहींनी तर खाजगी सावकाराचे दारे झिजवले आहेत. याचा परिणाम म्हणजे शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. शासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक संघाचे ऑडिट करून शेतकरी राजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा मनसे स्वस्थ बसणार नाही, असा गर्भित इशाराही घोलप यांनी दिला.