…म्हणून पती-पत्नीने पोलिस ठाण्यातच केला आत्महत्येचा प्रयत्‍न

    पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे राहत असलेल्या पती-पत्नी यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. तेथे ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी तक्रार देण्यावरून वाद झाला. त्यानंतर पोलीस ठाण्यातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.

    याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात लक्ष्मी टाकळी येथे राहणारे रहिवासी तानाजी गोविंद कांबळे व त्यांच्या पत्नी राणी तानाजी कांबळे या दोघांनी तालुका पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले ठाणे अंमलदार यांना माझी तक्रार घ्या? माझी तक्रार का घेत नाही? असे तावातावाने व मोठमोठ्याने बोलत होते. दरम्यान अमित ताटे यांनी तुमच्या तक्रारीचे स्वरूप काय आहे,काय झाले आहे, असे तानाजी कांबळे यांना विचारले असता कांबळे यांनी त्यांच्या तक्रारीबाबत उपयुक्त माहिती सांगितली नाही.

    दरम्यान, ताटे व साक्षीदारांची नजर चुकवून तानाजी कांबळे यांनी पत्नी राणी हिच्या साडीच्या पदराआड लपून, आपल्यासोबत आणलेल्या विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची फिर्याद ठाणे अंमलदार अमित भानुदास ताटे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद केली. सदर घटनेतील आरोपी पती-पत्नी यांच्यावर भां. दं. वि कलम ३०९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भागवत हे करीत आहेत.