कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठलाच्या ऑनलाईन दर्शनाची संख्या घटविली ; श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १७ मार्च २०२० रोजी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. या घटनेला वर्षपूर्ती झाल्याच्या दिवशीच ऑनलाईन दर्शनाची संख्या घटविण्यात आली आहे.

    पंढरपूर : महाराष्ट्रात दुसऱ्यांदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने श्री विठ्ठलाचे ऑनलाईन दर्शन बुकिंगची संख्या तीन हजारांवरून आता दीड हजारांवर आणली आहे. याबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. यामध्ये निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी बुधवार दिनांक १७ मार्च पासून केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

    कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १७ मार्च २०२० रोजी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. या घटनेला वर्षपूर्ती झाल्याच्या दिवशीच ऑनलाईन दर्शनाची संख्या घटविण्यात आली आहे.

    काही महिन्यांपूर्वी तब्बल आठ महिन्यानंतर म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२० पासून श्री विठ्ठलाचे ऑनलाईन मुखदर्शन सुरू करण्यात आले होते. सुरुवातीस कोरोनाचे नियम पाळून टप्प्याटप्प्याने भाविकांना ऑनलाईन दर्शन उपलब्ध करुन देण्यात आले होते. मात्र सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने वेगाने प्रादुर्भाव होत असल्याने खबरदारी म्हणून श्री विठ्ठलाचे ऑनलाइन दर्शन तीन हजारांवरून दीड हजारांवर करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. याची अंमलबजावणी आज बुधवार दिनांक १७ मार्च पासून केले जाणार आहे.