आगामी दोन-तीन वर्षांत साखर उद्योगाला चांगले दिवस येणार : संजयमामा शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ऊसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मिती या घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या इथेनॉलला प्रति लिटर चांगला भाव मिळणार आहे. तसेच वीज निर्मितीतूनही चांगली रक्कम कारखान्यांना मिळत आहे.

    टेंभुर्णी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ऊसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मिती या घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या इथेनॉलला प्रति लिटर चांगला भाव मिळणार आहे. तसेच वीज निर्मितीतूनही चांगली रक्कम कारखान्यांना मिळत आहे.

    ब्राझीलमध्ये सर्वात जास्त साखर उत्पादन होते. परंतु, सध्या तिथे दुष्काळ असल्यामुळे भारतातील साखरेला मागणी व उठाव वाढलेला आहे व भावही चांगला मिळत आहे. या सर्व बाबींमुळे आगामी दोन-तीन वर्षांत साखर उद्योगाला चांगले दिवस येणार आहेत आणि पर्यायाने शेतकऱ्यांना देखील त्यांच्या उसाला अतिशय चांगला भाव मिळणार आहे, असे मत माढा-करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे (Sanjaymama Shinde) यांनी मांडले. ते माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या 21 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

    याप्रसंगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबन शिंदे, पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंदे, व्हाईस चेअरमन वामन भाऊ उबाळे, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव, सर्व संचालक, शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.

    विशेष माहिती सांगताना संजयमामा शिंदे म्हणाले की, शरद पवार, साखर आयुक्त व साखर कामगार प्रतिनिधी यांची चर्चा होऊन साखर कामगारांना बारा टक्के पगार वाढ देण्याचा निर्णय झाला आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे पत्रकारांना माहिती देताना म्हणाले की , विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या कामगारांना पंधरा दिवसाचा पगार व 8. 33 टक्के बोनस यापूर्वी जाहीर झाला आहे. तसेच 1 नोव्हेंबर 21 पासून वाढीव बारा टक्के पगार वाढ कामगारांना देण्यात येईल.

    अधिक माहिती देताना आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, गळीत हंगामासाठी तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज आहे. एफआरपीप्रमाणे कारखान्याने दर दिलेला आहे व शेवटचे 176 रुपये प्रति टन ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहे. सध्या दररोज सर्वत्र पाऊस येत आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच ऊस तोडणी वाहतूक व गळीत हंगामाची रीतसर सुरुवात होईल. तसेच विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना ऊसाला चांगला दर देण्यात जिल्ह्यात अव्वल क्रमांकामध्ये असतो, हीच परंपरा पुढेही कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्ण विश्वासाने आपला ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे, असे अहवान त्यांनी केले.

    या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक प्रभाकर कुटे, रमेश येवले पाटील, पोपटराव चव्हाण, वेताळ जाधव, सुरेश बागल, शिवाजी डोके, पांडुरंग घाडगे, तसेच कारखान्याचे विभाग प्रमुख संभाजी थीटे, पोपटराव येलपल्ले, सी एस भोगाडे, मुलाणी, चंदनकर, देसाई, लवटे, बागल, जगदीश देवडकर, नागेश नाईकुडे, संजय कैचे, शशिकांत पवार आदी मान्यवरासह शेतकरी व कामगार उपस्थित होते.