कामती पोलिसांची अडचण दूर; पोलिस ठाण्याचे काम पूर्ण

  मोहोळ : कामती बुद्रुक ता. मोहोळ येथील नवीन पोलिस ठाण्याची इमारत बांधून पूर्ण झाली असून, ही इमारत वेगवेगळ्या कंपन्या व लोकवर्गणीतून साकारण्यात आली आहे. यामुळे गेल्या ११ वर्षांपासूनची पोलिसांची अडचण दूर झाली आहे. यामुळे कामात सुसूत्रता येणार आहे.

  सध्या कामती पोलीस ठाण्याचा कारभार केवळ दोन खोल्यांमध्ये चालतो. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच पोलीस ठाण्याला मैदानही कमी आहे. त्यामुळे वाहने रस्त्यावर उभी करावी लागत होती. त्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण झाला होता. या सर्व गैरसोयी लक्षात घेऊन अंकुश माने यांनी पदभार स्वीकारताच पत्रकार परिषद घेऊन लोकवर्गणीतून पोलीस ठाणे बांधण्याचा मानस व्यक्त केला होता. त्याप्रमाणे सोलापूर- मंगळवेढा रस्त्यावर पोलीस ठाण्याची दोन एकर जागा शिल्लक असल्याने या जागेवर बांधकाम करण्यासाठी अनेक उद्योजक व प्रगतशील बागायतदारांनी वस्तूरूपी मदत करून केवळ चार महिन्यांत ह्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

  दरम्यान, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनामुळे व अनेकांनी केलेल्या वस्तूरुपी मदतीमुळेच हे शक्य झाल्याची माहिती या पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली.

  स्वतंत्र कामती पोलिस ठाण्याची निर्मिती

  मोहोळ पोलिस ठाण्याचे विभाजन होऊन स्वतंत्र कामती पोलिस ठाण्याची निर्मिती झाली. या पोलिस ठाण्याच्या अधिपत्याखाली २८ गावांचा कारभार चालतो. २०१० सालापासून पोलिसांचे कामकाज कामती चौकातील तुटपुंज्या जागेत सुरू आहे. येथून नागपूर-सोलापूर, कोल्हापूर-रत्नागिरी व मोहोळ – कुरुल, कामती-कोरवली, मंद्रुप-तेरा मैल या दोन राष्ट्रीय महामार्गावर कामती येथील पोलीस ठाण्याची जागा अपुरी पडत आहे.

  वाहनांचे कर्णकर्कश, आवाज, नागरिकांचा गोंगाट, यामुळे पोलिसांना काम करणे अडचणीचे ठरत होते. पुरेसे लॉकअप नाही, त्यामुळे आरोपींना मोहोळ किंवा मंद्रूप पोलिस ठाण्यांच्या लॉकअपमध्ये ठेवावे लागते, त्यात वेळ व श्रम मोठे वाया जातात. कामती पोलिस ठाण्याच्या अधिपत्याखाली कुरुल, कामती व बेगमपूर ही तीन बीट आहेत. सध्याची नवीन इमारत मंगळवेढा सोलापूर महामार्गा नजीक असल्याने दळणवळण ही सोयीचे झाले आहे.

  प्रत्यक्षात वरिष्ठांशी व इतरांशी चर्चा झाल्यानंतर कामाला चार महिन्यांपूर्वी सुरूवात झाली. कामती बुद्रुक व कामती खुर्द या दोन्ही गावाच्या मध्यभागी ही इमारत साकारली आहे. कोणाकडून ही रोख स्वरूपात पैसे घ्यावयाचे नाहीत. याप्रमाणे सिमेंट खडी, स्टील, दारे-खिडक्या, रंग, या वस्तू रूपाने सर्वांनी मदत केली. त्यात बालाजी अमाईन्स, एस एम अवताडे आणि कंपनी, डीबीएल ग्रुप, महात्मा फुले सूत गिरणी वाघोली, रामचंद्र दादा पतंगे, कामती बु|| चे सरपंच रामराव भोसले-पाटील, कोरवलीचे शिवानंद पाटील, संतोष पाटील व तानाजी पाटील तसेच राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचे मोठे योगदान लाभले आहे.

  या इमारतीचे काम महावीर कन्स्ट्रक्शनचे इंजिनिअर दावणे यांनी केले असून या नवीन इमारतीत एकूण बारा खोल्या आहेत. त्यात अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांना विश्रांती कक्ष आहेत, तर सहाय्यक पोलिस निरीक्षक कक्ष हा स्वतंत्र आहे. सर्वसामान्यांसाठी लागणाऱ्या शौचालयाच्या उभारणीची जबाबदारी आदित्य एरिगेटर्स, व रामराव पाटील यांनी स्वीकारली आहे. तसेच आमदार यशवंत माने हे पेव्हर ब्लॉक व हायमास्ट दिवे बसवून देणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माने यांनी सांगितले.

  ●कामती पोलिस ठाण्याची सद्यस्थिती●
  एकूण बीट- 3
  पोलिस कर्मचारी- ५४
  बांधकामाचा कालावधी चार महिने
  मंगळवेढा- सोलापूर महामार्गावरील महत्त्वाचे पोलिस ठाणे म्हणून ओळख.

  ■एखादी गंभीर घटना घडली, तर पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी तसेच येणारे अभ्यागत यांना जागेअभावी नाहक त्रास व्हायचा. महिला कर्मचाऱ्यांना या कार्यालयात बसायचे व वावरायचे अवघड झाले होते. तक्रार घेताना ठाणे अंमलदार यांना जागेअभावी त्रास होत होता. त्यामुळे अपुऱ्या जागेतील कायमचा त्रास संपवण्यासाठी बांधून पूर्ण झालेली पोलीस ठाण्याची ही नवीन इमारत उद्घाटन करून लवकरच खुली करण्यात येणार आहे.

  – अंकुश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कामती पोलीस ठाणे