उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेवर धारधार शस्त्राने केला हल्ला

धारदार शस्त्र काढले व निर्मला यांना खाली ओढत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा हल्ला केला त्यांना रस्त्यावरच टाकून पाटील पळून गेला. संबंधित महिलेला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले

    मोहोळ: उसने दिलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून ३० वर्षीय महिलेवर धारधार शस्त्राने हल्ला करत ठार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भांबेवाडी, ता. मोहोळ येथे घटना घडली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निर्मला लक्ष्मण चौगुले रा. खडकपूर मोडनिंब ता. माढा ही महिला उपजीविका करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील देवडी पाटी येथील सार्थकराज हॉटेल येथे काम करते. या हॉटेलमध्ये चार महिन्यांपूर्वी कृष्णा उर्फ देवराज पाटील पूर्ण नाव माहिती नाही) हा चहा पिण्यासाठी आला होता. तिथेच दोघांची ओळख होऊन मैत्री झाली व पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातूनच निर्मला यांच्याकडून भिशीचे आलेले १ लाख ३० हजार रुपये गोड बोलून मागितले त्यांनी विश्वास ठेवून पैसे दिले. निर्मला यांच्या घराचे बांधकाम चालू केल्यामुळे त्यांनी उसने दिलेले पैसे कृष्णा पाटील यास मागितले. दि. ६ रोजी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास अर्जुसोंड पाटीजवळील एका हॉटेलमध्ये दोघांनी एकत्र जेवण केले.

    त्याचवेळी निर्मला यांनी पैशाबाबत विचारणा करत उसने दिलेले पैसे परत मागितले. रात्री ७.३० वा च्या सुमारास चल तुला पैसे देतो असे म्हणून पाटील याने कारमधून भांबेवाडी गावाच्या पुढे थोड्या अंतरावर निर्जन ठिकाणी आणले. त्यावेळी निर्मला यांनी गाडी का थांबवली असे विचारले असता गाडीत पाणी कमी आहे. पाणी घालायचे आहे असे सांगून धारदार शस्त्र काढले व निर्मला यांना खाली ओढत त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा हल्ला केला त्यांना रस्त्यावरच टाकून पाटील पळून गेला. नागरिकांनी यासंदर्भात मोहोळ पोलिसांशी संपर्क करत संबंधित महिलेला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.

    याप्रकरणी कृष्णा पाटील याच्या विरोधात निर्मला चौगुले यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात उसने दिलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून गंभीर जखमी करून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक खारगे करीत आहेत.