सीडीएम मशीनमधून ४९ वेळा ट्रांजेक्शन करून अडीच लाखांची चोरी

    सोलापूर : सात रस्ता येथील ई लॉबीमधील सी.डी.एम मशीनमधून ४९ वेळा ट्रांजेक्शन करून गैरकायदेशीर मार्गाने २ लाख ५० हजार रुपयांची चोरी केल्याची घटना ११ जुलै रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान सात रस्ता सोलापूर येथे घडली.

    याप्रकरणी बँक मॅनेजर चेतन गंगाधर शिंदे (वय २९,रा.सायली अपार्टमेंट, होटगी रोड, सोलापूर) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून महबूब नियाझोद्दिन खान (रा.सातघारिया,बडखाल सरकारी शाळेजवळ फरीदाबाद, हरियाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, स्टेट बँक शाखा सातरस्ता येथील ई लोबीमधील सी.डी.एम मशीनमधून आयडीएफसी बँकेतील कार्ड वापरून संशयित आरोपी महबूब याने त्याच्या कार्डचा गैरवापर करून एकूण ४९ ट्रांजेक्शन केले. त्यानंतर गैरपद्धतीने व गैरकायदेशीर मार्गाने एकूण २ लाख ५० हजार रुपयांची चोरी केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंके हे करीत आहेत.