…तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू; नगरसेवक देशमुख यांचा इशारा

    मोहोळ : मोहोळ नगरपरिषदेच्या विकासकामांचे सुमारे ४ कोटी पेक्षा अधिक तांत्रिक मंजुरीचे प्रस्ताव नगरपरिषदमध्ये पडून असताना आणखी त्याच प्रस्तावांना तांत्रिक मंजुरी मिळण्यासाठी नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडून राजकीय घाट घातला जात आहे. या प्रस्तावांची चौकशी करून त्यांना मंजुरी देण्यात येऊ नये, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

    नावे बदलून पुन्हा तांत्रिक मंजुरी

    मोहोळ नगरपरिषदेच्या माध्यमातून वर्षभरापूर्वी सुमारे ४ कोटीच्या विकासकामांची तांत्रिक मंजुरी घेतलेले प्रस्ताव नगरपरिषदमध्ये पडून आहेत. त्या प्रस्तावांसाठी नगरपरिषदच्या नागरिकांच्या करातून गोळ्या केलेल्या लाखो रुपयांची १.५ टक्के प्रमाणे शासकीय फी संबंधित कार्यालयाला नगरपरिषदेच्या फंडातून भरली आहे. असे असतानाही प्रभाग क्र. १ व १० मधील विविध विकास कामांचे ठराव होऊन त्याची तांत्रिक मंजुरी घेतलेली असतानाही ती नगरपरिषदेकडे पडून आहेत. दि. ७ मे च्या नगरपरिषदच्या शेवटच्या मासिक बैठकीत पुन्हा त्याच विकासकामांचे ठराव घेऊन त्याची नावे बदलून पुन्हा तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहेत.

    लाखो रुपयांचे होणार नुकसान

    या व अशा तांत्रिक मंजुरी घेतलेल्या विविध कामांची चौकशी करण्यात येऊन त्याचे पुन्हा तांत्रिक मंजुरी सादर करण्यात येऊ नये, त्यामुळे एकाच विकास कामासाठी दोन वेळा तांत्रिक मंजुरीची फी नगरपरिषदेला भरावी लागणार अाहे. नागरिकांनी कर रूपाने दिलेल्या पैशाची उधळपट्टी होणार आहे. त्यातून शहराचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. यामुळे मागील विकास कामांची तांत्रिक मंजुरी मिळालेल्या प्रस्तावांची चौकशी करावी, त्यानुसार पुन्हा त्याच प्रस्तावांना तांत्रिक मंजुरीसाठी पाठवू नये, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, इशारा नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी दिला आहे.