…तर तीव्र आंदोलन करू; कॉ. आडम यांचा इशारा

    सोलापूर : सोलापूर शहरातील बाजारपेठा प्रामुख्याने विडी व यंत्रमाग कारखाने तत्काळ सुरु करा, ही प्रमुख मागणी घेऊन शहर आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना सिटूचे शिष्टमंडळ चर्चेसाठी कार्यालयात जाताच पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून शेकडो महिला विडी कामगार आणि कार्यकर्ते यांच्यावर लाठी उगारून जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांची पोलीस मुख्यालयात रवानगी केली. वास्तविक हे धरणे आंदोलन अत्यंत शांततेत व संयमतेने सुरु असताना आंदोलन दडपून टाकणे हीच का? कायदा आणि सुव्यवस्था? असा सवाल करत २४ तासाच्या आत निर्णय जाहीर न केल्यास आणखी उग्र स्वरूपाचे आंदोलन गनिमीकाव्याच्या पद्धतीने करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिला.

    मागण्यांचे फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी

    गुरुवारी (दि. ३ जून) सेंटर ऑफ इंडियन्सच्या वतीने विडी व यंत्रमाग कारखाने आणि बाजारपेठा तातडीने सुरु करा, ही प्रमुख मागणी घेऊन सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगर पालिका आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. सुरुवातीला सिटूचे सर्व पदाधिकारी महिला विडी कामगार आणि कार्यकर्ते कोविड-१९ चे सर्व नियम पाळत शांततेत सोलापूर महानगर पालिका मुख्य प्रवेशद्वारावर दाखल झाले. तद्नंतर विडी व यंत्रमाग कारखाने चालू करा, बाजारपेठा चालू करा, अशा मागण्यांचे फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासना विरुद्धचा आक्रोश व्यक्त केला. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलिसांच्या ताफ्याने संपूर्ण आंदोलकांना घेराव घातला. लाठी उगारत, झटपट करत महिला विडी कामगारांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

    प्रशासनाकडून लॉकडाउनचे निर्बंध उठविण्याचे प्रयत्न सुरु

    कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या प्रमुख उपस्थितीत सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम. एच.शेख, माकपच्या नगरसेविका कामिनिताई आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदा बल्ला आदींचे शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांना समक्ष भेटून निवेदन देऊन चर्चा केली. चर्चेअंती आपल्या मागण्याबाबत २४ तासात निर्णय घेण्यात येईल. प्रशासनाकडून लॉकडाउनचे निर्बंध उठविण्याचे प्रयत्न चालू आहेत. असे लेखी आश्वासन देण्यात आले.