…तर राज्यभरात तीव्र आंदोलन करणार; रमेश बारसकर यांचा इशारा

    मोहोळ : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षणावर गदा आल्याने ओबीसींवर मोठा अन्याय झाला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सरकारने त्वरित कारवाई करावी. अन्यथा ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यभर तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून धूडगुस घालणार असल्याचे इशारा ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिला.

    स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्याच्या प्रमुख मागणीकरिता रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बारसकर बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सरकारने त्वरीत कार्यवाही करावी. सर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटिशनमध्ये दिलेल्या निकालामुळे पंचायत राज संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे.

    संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषदा व महानगरपालिकामधील ओबीसीसाठी राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागांवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात ओबीसींमध्ये असंतोष पसरला असून सरकारने या मागण्यांची दखल घेऊन आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न नाही केला तर ज्योती क्रांती परिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्यभर आंदोलने करणार असल्याचेही रमेश बारसकर यांनी सांगितले.

    यावेळी शिलवंत क्षीरसागर यांनी मोर्चाचा हेतू विशद केला. यावेळी संगीता पवार, अनंत नागनकेरी, यांनी मनोगते व्यक्त केली. प्रदेश प्रवक्ते शीलवंत क्षीरसागर, सिद्धार्थ एकमल्ले, जितेंद्र अष्टुळ, अतुल क्षीरसागर, रमेश सनगर, अनंता नागनकेरी, सागर अष्टुळ, बाळासाहेब माळी, आकाश नाळे, संगीता पवार, सुलतान पटेल, सोमनाथ माळी, श्रीकांत गाढवे, अजय कुर्डे, लखन कोळी आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या वतीने निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे यांनी स्वीकारले.