लग्न समारंभात आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी लांबवली; ७१ हजारांचा ऐवज लंपास

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : भावाच्या लग्नासाठी आलेल्या विवाहितेचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली पर्स अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना रविवारी (दि. १८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाटकुल (ता. मोहोळ) येथे घडली. या पर्समध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनिता दत्तात्रय पाराध्ये (रा. गोपाळपूर ता. पंढरपूर) यांच्या भावाचे मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील लोंढे वस्तीवर लग्नकार्य होते. त्यामुळे त्या कुटुंबासमवेत त्या ठिकाणी आल्या होत्या. पाराध्ये यांनी लग्नासाठी येताना स्वतःचे व मुलीचे कानातील सोन्याचे दागिने व रोख दीड हजार रुपये असे पर्समध्ये घेऊन आल्या होत्या. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लग्नकार्य सुरू असताना एका खोलीत सर्व महिला बसल्या होत्या. त्याच ठिकाणी पाराध्ये यांची दागिन्यांची पर्स ठेवून त्या खोलीमध्ये असणाऱ्या इतर महिलांना ते बघा असे त्यांना सांगून दरवाजा उघडा ठेवून लग्नाच्या अक्षदा सुरू झाल्यामुळे बाहेर आल्या होत्या.

    दोन अक्षदा टाकून परत त्या दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रूममध्ये पर्स घेण्यासाठी गेल्या असता ठेवलेल्या ठिकाणी त्यांची पर्स दिसली नाही म्हणून जवळपास व तेथे असलेल्या सर्व नातेवाइकांकडे विचारपूस करून शोध घेतला. मात्र, ही पर्स मिळून न आल्याने कोणीतरी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. त्या पर्समध्ये कर्णफुले, रिंग जोड, साखळी व रोख दीड हजार रुपये असा एकूण ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला असल्याची फिर्याद वनिता पाराध्ये यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दिली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार लोभु चव्हाण करत आहेत.