घर फोडीसह वाहन चोरी करणारी टोळी अटकेत; मोहळ पोलिसांची कारवाई

या तिघांनी मोहोळसह पंढरपूर व पुणे परिसरात केलेल्या चोऱ्या मोहोळ पोलिसांनी उघडकीस आणल्या. या तिघांकडून लॅपटॉप, मोटारसायकलसह जीप जप्त केली आहे. जवळपास ५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

    मोहोळ: मोहोळ येथील घरफोडीसह चारचाकी वाहने पळवणाऱ्या तिघांना उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परिसरात मोहोळ पोलिसांनी शिताफीने पकडले. या तिघांनी मोहोळसह पंढरपूर व पुणे परिसरात केलेल्या चोऱ्या मोहोळ पोलिसांनी उघडकीस आणल्या. या तिघांकडून लॅपटॉप, मोटारसायकलसह जीप जप्त केली आहे. जवळपास ५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसनी काळे (रा.भूम, जि उस्मानाबाद), महमद्या उर्फ महमद अन्वर शेख, रवी उर्फ हाड्या मधुकर पवार (दोघे रा. ढोकबाभुळगाव, ता. मोहोळ) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत या तिघांनी मोहोळ परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहिती नुसार मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीतील आरोपी हे भूम, परांडा परिसरात वावरत असल्याची माहितीपोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना मिळाली होती.

    पोलीस नाईक शरद ढावरे, गणेश दळवी, पांडुरंग जगताप, हरीदास थोरात, लखन घाडगे व हेड कॉन्स्टेबल सचिन माने या डी बी पथकाने सापळा रचला. सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल रवी हटकिले यांच्या मदतीने परांडा, अंबेजोगाई, भूम या ठिकाणी जावून शोध घेतला व त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता पंढरपूर व यवत (जि. पुणे) येथेही चोऱ्या केल्याचे उघडकीस आणले. त्यांच्याकडून दोन लॅपटाप, दोन एल ई.डी. दोन मोटर सायकली, बोलेरो जीप जप्त केली असून या चोरीच्या घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल शरद ढावरे हे करत आहेत.