ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न एका महिन्यात सोडवू; दिलीप स्वामी यांचे आश्वासन

    सोलापुर : सोलापुर जिल्ह्यात १०२९ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींमध्ये आकृतीबंधातील व आकृतीबंधाबाहेरील २ ते ३ हजार कर्मचारी विविध पदावर काम करीत आहेत. शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. परंतु ग्रामपंचायतस्तरावर या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी ग्रामसेवक यांच्याकडून केली जात नाही. त्यामुळे सोलापुर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचा-यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचा-यामध्ये फार मोठी नाराजी पसरली आहे.

    ग्रामपंचायत स्तरावर शासन निर्णयाची व जिल्हा परीषदे कडुन देण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. अनेक कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी ग्रामसेवक यांनी जाणीवपुर्वक अपुर्ण ठेवल्या असल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे म्हणुन ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने गुरुवारी १ जुलै २१ रोजी जिल्हा परीषदेवर मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु कोरोनाची सध्याची परिस्थिती पहाता पोलीस यंत्रणेने मोर्चास परवानगी नाकारल्याने पोलीस प्रशासनाने प्रमुख पदाधिकाऱ्यानाच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन देण्याची परवानगी दिली.

    त्यानंतर त्यांना कर्मचारी युनियनच्या वतीने सोलापुर जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याचे निवेदन जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, कार्याध्यक्ष मोहन लामकाने, सरचिणीस महादेव माळी, प्रसिद्धी प्रमुख अरुण सुर्वे, दिनकर खंडागळे, मसुदेव रणदिवे इ . पदाधिकाऱ्याचे शिष्टमंडळास ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न एक महिन्याच्या आत सोडविण्याचे आश्वासन दिलीप स्वामी यांनी दिले आहे. यावेळी गुरुबा भोसले, नागेश लोंढे, बालाजी पवार, लक्ष्मण खरात, पांडुरंग खरात, रामभाऊ गरड, संजय वाघमारे, शाम मळगे आदी उपस्थित होते.