लसीकरणासाठी देण्यात येणारे टोकन बंद करावेत; बाळराजे पाटील यांची मागणी

    सोलापूर : कोरोना लसीकरणासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायतींमार्फत नागरिकांना टोकन पास देण्यात येत आहेत. गावातील गटातटाच्या राजकारणामुळे अनेकांना लसीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी देण्यात येणारे टोकन पास तात्काळ बंद करावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे.

    बैरागवाडी (ता. मोहोळ) या गावात ग्रामपंचायतच्या लसीकरणाचे टोकन हे राजकीय दृष्टीकोनातून दिले जातात. ज्यांना टोकन दिले जाते. त्यातील काही लोक हे वाड्या-वस्त्यांवर व बाहेरगावी राहत असतात. त्यांना या टोकनांचा लाभ मिळत नाही. ते लसीकरणास आल्यास त्यांना टोकन घ्यायचे म्हटल्यास त्यांची धावपळ होते. विशेष म्हणजे टोकन वाटप करताना ज्या ग्रामपंचायतींची सत्ता आहे. ते आपल्या मर्जीतील लोकांना टोकन देण्याचे काम करतात. जे लोक लसीकरणास हजर असतील त्यांना नंबरप्रमाणे लस देण्यात यावी, अशी मागणी बाळराजे पाटील यांनी केली आहे.

    यावेळी लोकनेते शुगरचे संचालक मदनसिंह पाटील, मोहोळ बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय पवार, ढेकळेवाडीचे राजाभाऊ ढेकळे, आष्टीचे सचिन गुंड आदी उपस्थित होते.