‘बा विठ्ठला, दार उघड आता’; आषाढी यात्रा बंद झाल्याने व्यापाऱ्यांचा टाहो

  पंढरपूर/राजेश शिंदे : मागील वर्षी कोरोनाची लाट नव्याने उगवल्यामुळे लक्षावधी रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्र शासनाने आषाढी सोहळा पायी पालखी सोहळ्यावर बंदी घातली होती. याही वर्षी आषाढी पालखी सोहळा होणार नसल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. तसेच रेल्वे एसटी व प्रवासी वाहतूक यावर शासनाने बंदी घातल्यामुळे पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जवळपास शून्यावर येऊन ठेपली आहे.

  सध्या विठ्ठल मंदिर बंद असल्याने पंढरीत होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल देखील ठप्प झाल्याने विठ्ठलाच्या आधारावर जगणारे शेकडो व्यापारी हवालदिल झाले असून आता विठ्ठलाने या संकटातून बाहेर काढावे, यासाठी विठ्ठला दार उघड आता दार उघड असे म्हणण्याची पाळी व्यापाऱ्यांवर आली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर हे पंढरीत येणाऱ्या विठ्ठलाच्या भाविकांच्या आधारावर रुपयांची उलाढाल करते. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शासनाने अद्यापपर्यंत आषाढी यात्रेला परवानगी दिली नाही. तसेच सध्या विठ्ठल मंदिर बंद असल्याने व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर जरी दुकाने उघडली असली, तरी पंढरपुरात भाविक येत नसल्याने प्रासादिक वस्तू विकणाऱ्या तुळशीमाळा, वीणा, पकवाज, दगडी व धातूंच्या मुर्त्या, पितळी कळस, पेढे, उदबत्ती, हळदी कुंकू, बुक्का, प्रसाद, हार, तसेच खेळणी विकणाऱ्या अशा अनेक व्यापाऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. यातच भर म्हणून महाराष्ट्र शासनाने यंदाही पालखी सोहळा एसटी बसद्वारे होईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरीत व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

  पंढरीत प्रासादिक वस्तूंचा व्यापार करणारे काही मोजकेच पिढीजात व्यापारी आहेत. तर इतर व्यापारी कर्जाऊ, व्याजाने पैसे घेऊन विक्रीसाठी आपला प्रासादिक माल दुकानांमध्ये भरतात. हॉटेल, लॉज, खानावळ, खाजगी घरांमधून भाड्याने दिल्या जाणाऱ्या खोल्या, वाहन पार्किंग, चहा टपऱ्या, पिण्याचे पाणी विक्री तसेच प्रसादिक वस्तूंच्या विक्रीमधून पंढरीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र ही उलाढाल सध्या आषाढी यात्रेवर बंदी असल्यामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे पंढरीतील आर्थिक गणित पूर्णतः बिघडून गेले आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सांभाळणारे सहकारी क्षेत्रातील साखर कारखाने सध्या काही अंशी बंद असल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही पूर्णपणे ठप्प झाली आहे.

  आषाढी पायी पालखी सोहळ्यासाठी दरवर्षी सुमारे बारा लाख भाविक दिंड्या, पालख्या याद्वारे दाखल होतात. तर माघी, चैत्री आणि कार्तिकी या प्रमुख तीन यात्रांमध्ये सुमारे चार लाख भाविक पंढरीत दाखल होतात. यात्रा हा काळ सोडून देखील वर्षभर भाविक पंढरपुरात येतच असतात. या भाविकांच्या पंढरपुरात येण्यावर व्यापार्‍यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे आणि तेच गेल्या दोन वर्षापासून बंद पडले आहे.

  – मागील वर्षी कोरोनाची लाट आल्यामुळे शासनाने अचानक आषाढी यात्रेवर बंदी घातली. मात्र, यापूर्वी अनेक व्यापाऱ्यांनी यात्रा भरेल, अशा आशेने भरल्याने अनेक व्यापारी कर्जबाजारी झाले होते. आमचा पिढीजात व्यवसाय असल्यामुळे आम्ही टिकून राहिलो आहोत.

  –  धनंजय लाड, अगरबत्ती उत्पादक, पंढरपूर

  कोरोनाच्या भितीने सध्या मंदिर बंद असल्याने राज्यभरातून येणारे भाविक पंढरपूरकडे पाठ फिरवत आहेत. वीणा मृदंग बनवणारे कामगार हे पिढीजात पारंपारिक कलाकार असल्याने त्यांना दुसरे काम करणे अशक्य आहे. अशा कलाकारांना जगवणे, शासनाचे कर्तव्य आहे. शासन जर मोठ्या उद्योगांना मदत करत असेल, तर आमच्यासारख्या छोट्या उद्योगांना ही शासनाने वाचवले पाहिजे.

  – बाळासाहेब पुली, वीणा पखवाज मृदंग उत्पादक, पंढरपूर

  सध्या मंदिर बंद असल्यामुळे फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होत असली, तरी हार आणि तुळशी माळांना कुठलीच मागणी नाही. रोज पोट कसे भरायचे, हाच प्रश्न आहे. घरात आठ माणसे आहेत. पण शासन मदत करत नसल्याने आमच्यासारख्या विक्रेत्यावर उपासमारीची पाळी आली आहे. देऊळ कधी उघडणार, कोणास ठाऊक.

  – आकाश देवमारे, फुलमाळा हार विक्रेते, पंढरपूर