गावठी पिस्तुल, काडतुस घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक

  सोलापूर : मोहरम सणानिमित्त सोलापूर आयुक्तालय हद्दीमध्ये पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर व त्यांचे पथकातील अंमलदार शहरात गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी, तसेच अवैध धंदे व अवैध शस्त्रे यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले.

  सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर, गुन्हे शाखा यांना गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, विशाल यलप्पा गायकवाड व त्याचा मित्र महादेव शंकर चव्हाण यांचेकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आहे व ते पिस्तुल घेवुन ते रेल्वे स्टेशन जवळील काडादी चाळी समोरील सिनियर सेक्शन कार्यालयासमोर येणार आहेत. त्यावरुन पोलिसांना बातमीची खात्री पटताच लागलीच त्यांनी सापळा रचला. स.फौ आखाडे यांच्या माध्यमातून दोन पंचांना बोलावले. सातरस्ता ते रेल्वे स्टेशन जाणारे रोडवरील काडादी चाळी समोरील सिनियर सेक्शन (पुल) इंजिनिअर कार्यालय, येथील सय्यद गॅरेज बोर्डचे रोडलगतच्या फुटपाथचे आसपास सापळा लावला.

  त्यामध्ये विशाल यलप्पा गायकवाड, (वय-२५ वर्षे ) व्यवसाय मजुरी, रा. सेटलमेंट फ्रि-कॉलनी नं-४, सोलापूर व २) महादेव शंकर चव्हाण, (वय-२९ वर्षे, व्यवसाय बांधकाम व्यवसायिक, रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल, सोलापूर) हे ठरलेल्या ठिकाणी रेल्वे स्टेशन जवळील काडादी चाळी समोरील सीनियर सेक्शन कार्यालयाजवळील सय्यद गॅरेज बोर्डचे समोर आले त्यावेळी सफौ/सुहास आखाडे यांनी बोलावून आणलेले दोन पंचासमक्ष सदर संशयीत दोन इसमांना सपोनि सचिन बंडगर व पथकातील अंमलदार यांनी गराडा घालुन पकडले. त्यावेळी पहाटेचे दोन वाजून 20 मिनिटे झाले होती.

  पंचासमक्ष त्या दोघांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी विशाल यलप्पा गायकवाड याचे बरमडा पॅन्टचे डावे बाजूस कंबरे जवळ एक देशी पिस्टल खोवलेल्या लपवून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आले. तसेच त्याचे बरमोडाच्या डावे खिशात प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये १ जिवंत काडतूस मिळून आले. त्यांना शस्त्राचे परवान्याबाबत विचारणा केली. परंतु त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदरचे शस्त्र हे त्यांनी बेकायदेशीर रित्या जवळ बाळगले असल्याची खात्री झाल्याने पंचांचे समक्ष त्यांचेकडे मिळून आलेले एक देशी बनावटी गावठी पिस्तुल व ०१ जिवंत काडतुस व दोन मोबाईल अशा वस्तू एकूण रक्कम ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आला. सदर गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली आहे.

  यातील आरोपी विशाल यलप्पा गायकवाड, (वय-२५ वर्षे. व्यवसाय मजुरी, रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी नं-४, सोलापूर) हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या आरोपी महादेव शंकर चव्हाण, (वय २९ वर्षे, व्यवसाय बांधकाम व्यवसायिक, रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल, सोलापूर) यांच्याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. देशी बनावटीचे गावठी पिस्तुल विक्री करता आणले की त्या गावठी पिस्तुलचा वापर कशासाठी करणार आहेत. याबाबत तपास चालू आहे.

  सदरची कामगीरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) बापू बांगर, यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर, सफा/सुहास आखाडे, पोलीस अंमलदार निलेश शिरूर, राजू मुदगल, विजय वाळके, प्रविण मोरे, संतोष येळे, अभिजीत धायगुडे, प्रथमेश काळेल, लक्ष्मण वसेकर, चापोना. संजय काकडे यांनी केली आहे.