उजनी जलाशय पर्यटनकेंद्र विकास आराखडा होणार तयार, निधीचीही तरतूद

    अकलूज : भाजपचे नेते धैर्यशील मोहीते-पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्या मागणीला व पाठपुराव्याला यश आले असून, आता उजनी येथील 43 हेक्टर क्षेत्रावर पर्यटन केंद्र उभा करण्याच्या हालचाली सुरू असून, याचा प्राथमिक आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी सहा कोटी रूपयांचा निधी ही मंजूर झाला आहे. या पर्यटन केंद्रात बोटिंग, पक्षी निरीक्षण केंद्र, मनोरंजनाची साधने व अन्य बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.

    उजनी जलाशय येथील नौकाविहार रोजगार निर्मितीचे मोठे साधन आहे. यासाठी पर्यटकांची जेवढी सुरक्षेची काळजी घेता येईल तेवढी खबरदारी शासनाने घ्यावी. पर्यटनवाढीसाठी शासनस्तरावर पर्यटन विकास केंद्र, पक्षी निरीक्षण केंद्र, मत्स्य अभ्यास केंद्र, वनस्पती अभ्यास केंद्र व्हावे. पक्षी निरीक्षणासाठी ठिकठिकाणी टॉवर उपलब्ध होण्याची गरज आहे. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी करमाळा तालुक्यातील वांगी येथे उजनीच्या बॅकवाॅटरमध्ये घडली. नौकाविहार करत असताना नाविकाचे बोटवरचे नियंत्रण सुटल्याने बोट उलटून अकलूज येथील पिता पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर मोहीते पाटील यांनी येथील अपघात टाळण्यासाठी बॅकवॉटरमध्ये ठिकठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटनाच्या दृष्टीकोनातून पर्यटनकेंद्रीत उजनी जलाशयचा विकास व्हावा, अशी मागणीवजा पाठपुरवठा धैर्यशील मोहिते पाटील यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता.

    या पर्यटन केंद्रासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सहा कोटींचा निधी मंजूर झाला असून, जिल्हा नियोजन समितीमधूनही निधी उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. पर्यटन केंद्र सज्ज झाल्यानंतर ते बीओटी तत्त्वावर देण्यात येणार आहे. या पर्यटन केंद्रामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतील. त्यानंतर त्या परिसरात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. पर्यटकांच्या दृष्टीने सर्वसमावेशक असे पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शंभरकर यांनी सांगितले.