अज्ञात शेतकऱ्यांनी एनटीपीसीचे वीज वाहक टॉवर पाडले ; नुकसानभरपाई रक्कम चौपट मिळण्याच्या मागणीसाठी टॉवर पाडल्याची चर्चा

शेतकऱ्यांच्या शेतात उभारण्यात असलेल्या टॉवरच्या जागेला अपेक्षित नुकसान भरपाई मिळाली नाही. किमान एका टॉवरसाठी १० लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. तरीही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई किंवा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे पंढरपूर तालुक्‍यात वीज टॉवर पाडण्याच्या अशा वारंवार घटना घडू लागल्या आहेत.

    पंढरपूर : एनटीपीसीने पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शेतात उभारलेले ३० हून अधिक वीज वाहक टॉवर अज्ञात शेतकऱ्यांनी कटरच्या साहाय्याने कापून पाडले आहेत. ही धक्कादायक घटना मंगळवार दि.९ मार्च रोजी सकाळी स्थानिक लोकांच्या निदर्शनास आली. बाधित क्षेत्राला चौपट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी हे कृत्य केले असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

    सोलापूर येथील एनटीपीसी प्रकल्पातून उजनी धरणापर्यंत १३२ केव्ही क्षमतेच्या वीज वाहिनीचे काम सुरू आहे. यासाठी सुमारे ३२ फूट उंचीचे टॉवर उभारण्यात आले आहेत. सोलापूर ते उजनी धरणा दरम्यान सुमारे तीन हजार शेतकऱ्यांच्या शेतात वीज वाहिनीचे टॉवर उभारण्यात आले आहेत.

    दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतात उभारण्यात असलेल्या टॉवरच्या जागेला अपेक्षित नुकसान भरपाई मिळाली नाही. किमान एका टॉवरसाठी १० लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. तरीही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई किंवा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे पंढरपूर तालुक्‍यात वीज टॉवर पाडण्याच्या अशा वारंवार घटना घडू लागल्या आहेत.

    गेल्या वर्षी देखील टॉवर पाडण्याच्या अशा घटना या भागात घडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा टॉवर कापण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्‍यातील आढीव, गुरसाळे, चिलाईवाडी, आंबे, सरकोली, देगाव या भागातील सुमारे २५ ते ३० टॉवर कापून नुकसान करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.या संदर्भात अद्याप तक्रार दाखल झाली नाही.