कुपोषित, दुर्धर आजाराने ग्रस्त बालकांच्या पालकांचे प्राधान्याने लसीकरण : स्वामी

    सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांना संसर्गाचा जास्त धोका असल्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेने कुपोषित, गंभीर आजारी असणाऱ्या बालकांच्या पालकांना कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमात प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

    सीईओ स्वामी म्हणाले की, दुसऱ्या लाटेत सुमारे १२ टक्के बालके बाधित झाली आहेत. कुपोषणग्रस्त तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त बालकांना त्यांच्या पालकांकडून संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे १० जूनपासून सुरू होणाऱ्या ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी मोहिमेत निदान झालेल्या SAM व MAM बालके, दुर्धर आजारी, ह्रदयरोगग्रस्त बालकांची यादी अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्याध्यापक यांनी अद्ययावत करून घेतील व या याद्या बालविकास प्रकल्प अधिकारी एकत्र करून तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे द्याव्यात.

    तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र व गावनिहाय याद्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देतील आणि वैद्यकीय अधिकारी या याद्यांप्रमाणे पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण प्राधान्याने करून घेतील. जिल्हा परिषद प्रशासन कोविड-१९ ची तिसरी लाट थोपवण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यात प्रथमच कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेगळा पॅटर्न सुरू केला आहे.