वंचितचे प्रदेश प्रवक्ते चंदनशिवे राष्ट्रवादीच्या वाटेवर; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घेतली भेट

गेल्या अनेक दिवसापासून आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा होती. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट घडवून आणली आहे.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक आनंद चंदनशिवे (Anand Chandanshive) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(NCP) प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरत असताना मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची चंदनशिवे यांनी भेट घेतल्यााने कार्यकर्त्यांनी राजकीय पटलावर चर्चेला उधाण आले आहे.

    गुरुवारी आनंद चंदनशिवे यांच्यासह नगरसेवक गणेश पुजारी यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. सोलापूर शहराच्या विकास कामासंदर्भात भेट घेतल्याचे आनंद चंदनशिवे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून आनंद चंदनशिवे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा होती. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांची भेट घडवून आणली. आनंद चंदनशिवे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे आणि एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांचा राष्ट्रवादी पक्ष पक्ष प्रवेश होण्याची चर्चा रंगली आहे.

    शरद पवारांच्या दाैऱ्यात पक्ष प्रवेश ?

    पक्ष प्रमुख शरद पवार सोलापूर दौऱ्यावर येणार असून यादरम्यान नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, जिल्हाध्यक्ष महेश कोठे, नगरसेवक रफिक शेख यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका नजरेसमोर ठेवून या घडामाेडी सुरू आहेत.

    लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आनंद चंदनशिवे वंचितपासून दूर जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर महानगरपालिकेत भारदस्त आवाजाने सभागृहाचे लक्ष वेधले आहे. महेश कोठे यांची अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेमध्ये मजबूत पकड आहे. नगरसेवक तोफिक शेख यांच्याकडे कार्यकर्त्यांचे संघटन आहे. आगामी काळात अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश हाेण्याची शक्यता आहे.