सरपंच परिषदेच्या माध्यमातून गावचे प्रश्न मार्गी लावणार : लामकाने

    सोलापूर : सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्हा सरपंच व गावात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य संघटना चांगले काम करीत असून, आम्हाला या संघटनेने तालुक्याची जबाबदारी दिली. या माध्यमातून तालुक्यातील सरपंच व विकासकामात येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे उत्तर सोलापूर तालुका समन्वयक भाऊसाहेब लामकाने यांनी सांगितले.

    सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेने उत्तर सोलापूर तालुका समन्वयकपदी अकोलेकाटीचे सरपंच भाऊसाहेब लामकाने, नंदूरचे सरपंच संभाजी पाटील, नान्नज ग्रामपंचायत सदस्या अरुणा गवळी व कौठाळीचे सरपंच चंद्रप्रभा भास्कर यांची नियुक्ती करण्यात आली.

    सोलापूर येथे संघटनेचे सरचिटणीस ऍड.विकास जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील, जिल्हा समन्वयक पंडीत ढवण, कुलदिप कौलगे उपस्थित होते.

    सरपंच परिषद ही मान्यताप्राप्त संघटना असून, सरपंचाचे हक्कासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. आम्ही देखील तालुक्यातील सरपंचाचे व विकासाच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करेन, असे भाऊसाहेब लामकाने यांनी सांगितले. माझी झालेली अनपेक्षितपणे निवड माझ्या कामाची पावती समजते. आम्ही राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सर्वांना एकत्रित घेऊन गावच्या विकासासाठी व सरपंचाचे हक्कासाठी शासन, प्रशासनाकडे संघटनेच्या माध्यमातून काम करु, असे चंद्रप्रभा भास्कर यांनी सांगितले.

    यावेळी गावपातळीवर विकास कामात जाणूनबुजून अथवा राजकीय हेतूने अडथळा आणला जात असेल. प्रशासनाकडून नाहक अडवणूक केली जात असेल तर तालुका समन्वयांचे मागे जिल्हा व राज्य संघटना राहील, असे ऍड. विकास जाधव व आदिनाथ देशमुख यांनी सांगितले.