मराठा क्रांतीचा विराट मोर्चा उद्या; पण…

    सोलापूर : मराठा क्रांती मोर्चाचा सोलापुरात ४ जुलै रोजी विराट मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी सांगली, सातारावरून पोलिस बंदोबस्त मागितला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत सांगली, साताराहून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त सोलापुरात हजर करण्याचे पोलीस महासंचालकांचे आदेश आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाचा पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्याबाबत मोर्चाचे समन्वयक, संयोजक यांना नोटीस दिली आहे. नोटीस बजावून हे मोर्चा काढल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येत्या रविवारी मराठी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर शहरात यादिवशी दिवसभर कडक संचारबंदी राहणार आहे. याबाबत कलम १४४ (१) (३) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रमाणे मनाई आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी काढले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना दिलेली आहे. शहर व जिल्ह्यात पहिल्या व दुसर्‍यास लाटेत अनेक जणांनी कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्याने जीव गमावला. जिल्ह्यात कोविड डेल्टाचे रुग्ण सापडत आहेत.

    सोलापूर शहरातील नागरिकांनी अत्यंत कष्टाने नियमांचे पालन करुन रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले. ४ जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे गर्दी होणार असून, कोरोना विषाणू संक्रमण होऊ शकते व अनेकांच्या जीवास धोका निर्माण होवू शकतो. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा डेल्टा प्लसचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी निर्बंध लागू केले आहेत. या आदेशामध्ये सर्व प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांना परवानगी राहणार नाही.

    तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा हे प्रत्येक शनिवारी व रविवारी पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता सोलापूर शहरात ४ जुलै रोजी ००.०१ वाजल्यापासून ते ४ जुलै रात्री २४.०० वाजेपर्यंंत (शनिवारी रात्री बारा ते रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत) आदेश लागू करण्यात येत आहे. त्यानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील. शहरात येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून ) प्रवेशास-वाहतुकीस बंदी राहील, असे पोलीस आयुक्त शिंदे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.