अंनिसच्या जटानिर्मुलन मोहिमेस प्रतिसाद, विडी घरकुलमध्ये महिला जटामुक्त

    सोलापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शाखेने महिलांच्या जटानिर्मुलनासाठी एक मोहिम सुरु केली. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून वस्ती पातळीवरील कार्यकर्ते आता यासाठी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत आहेत. गेल्या वीस दिवसात अशी चौथी केस यशस्वी झाली.

    हैद्राबाद रोड, विडी घरकुल येथील तारामती महादेव कलशेट्टी (वय 66) यांनी गेल्या 35 वर्षांपासून जटा वाढविल्या होत्या, पण 5 – 6 वर्षांपासून याचा त्यांना जीवघेणा त्रास होत होता. मान दुखी, डोके दुखी, सारखी खाज यामुळे चिडचिड व झोप निट होत नव्हती, असे पती महादेव कलशेट्टी म्हणाले. मग त्यांनी आपले मित्र व विडी घरकुल मधील सामाजिक कार्यकर्ते अंबादास गट्टी यांना ही व्यथा सांगितली, दोघांनी चर्चा करुन अंनिसशी संपर्क साधला.

    अंनिस राज्य समिती सदस्या निशा भोसले, कार्याध्यक्ष व्हि. डी. गायकवाड, ऍड. सरिता मोकाशी, लता ढेरे व अंजली नानल यांनी जटानिर्मुलन केले. त्यांचे पती महादेव कलशेट्टी यानी अंनिसचे आभार मानले. गरीब लोक अंधश्रध्देपोटी व जटा काढण्यास खुप खर्च येतो म्हणून त्रास सहन करतात, अशा लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन अंनिसने केले आहे.