जिल्हा परिषद सदस्यांचा प्रवेशद्वारावर ठिय्या; ऑनलाइन सभेवर बहिष्कार

  सोलापूर/नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषद सदस्यांचा अ‌पेक्षाभंग झाला आहे. सोमवारी होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाईन सभेवर सदस्यांनी बहिष्कार टाकत जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा बहिष्कार केला. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून सदस्यांनी निषेध व्यक्त केला.

  जोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी सभेची तारीख खुल्या सभागृहात जाहीर करत नाहीत, तोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांना मुख्यालयात प्रवेश करू देणार नसल्याचे ठाम भूमिका सदस्यांनी घेतले आहे. या ठिय्या आंदोलनास जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण उपस्थित होते. सदस्य सचिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास भारत शिंदे, बाळासाहेब धाईंजे, सुभाष माने, अरुण तोडकर, शिवानंद पाटील, नितीन नकाते, बिभिषण आवटे, रेखा राऊत, पंचायत सभापती रजनी भडकुंबे, स्वाती कांबळे, मंजुळा कोळेकर, पाटील, मल्लिकार्जुन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

  जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने घ्या, अशी मागणी सदस्यांकडून होत आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे सदस्यांचे म्हणणे आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी खुल्या सभागृहात सभा घेण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी 12 जुलै रोजी सर्वसाधारण सभा बोलावली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरासाठी तिसरा स्तर लागू केला आहे. त्यामुळे ही सभा खुल्या सभागृहात घेण्यास परवानगी द्यावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव दिला होता.

  जिल्हाधिकारी शंभरकर यांनी डेल्टा प्लसच्या संसर्ग भीतीमुळे खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनातील महत्त्वाच्या सर्व बैठका ऑनलाइन घेण्यात येत आहेत. त्याप्रमाणेच महापालिकेची सभा झाली आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभाही ऑनलाईन घ्यावी अशी सूचना केली आहे. त्यामुळे सोमवारी होणारी सभा ऑनलाईनच होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले. दरम्यान या पाशर्वभूमीवर सदस्यांचा हिरमोड झाला आहे.

  जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन

  जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेत असल्यामुळे सदस्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जोपर्यंत खुल्या सभागृहात सभा घेण्यात येत नाही, तोपर्यंत सदस्यांनी संघर्ष सुरू ठेवला आहे. आजची होणारी सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी जाहीर केले

  सदस्यांची दिशाभूल

  ऑफलाईन सभेची १९ तारीख देऊन सदस्यांची पुन्हा दिशाभूल करण्यात आली आहे. या तारखेला मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय पूजा पंढरपूरात होणार आहे. त्यामुळे जि.प.चे सर्व अधिकारी प्रोटोकॉलसाठी तिथे उपस्थित असतात.