जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उद्या देणार १०२८ गावांना भेटी

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.

    सोलापूर : मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून गाव पातळीवर कोरोना प्रतिबंधाचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. सीईओ स्वामी यांनी पदभार घेतल्यानंतर “माझे गाव कोरोना मुक्त गाव” हे अभियान सुरू केले. तसेच काही दिवसांपूर्वी “माझे दुकान माझी जबाबदारी” या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

    त्याचप्रमाणे सर्व विभाग प्रमुख व तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना गावभेटीचे आदेश काढून काढण्यात आले आहेत. कालपासून जिल्ह्यामध्ये अनेक गावात प्रतिबंधित क्षेत्र तयार केले असून प्रतिबंधित क्षेत्रात दळणवळण व नागरिकांना संचारास बंदी घालण्यात आलेली आहे. राज्य शासनाकडून ही कोरोना प्रतिबंधासाठी अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तरीही कोरोनाची रूग्णवाढ आटोक्यात येताना दिसून येत नाही.

    या सर्व पार्श्वभूमीवर सीईओ स्वामी यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत शिवरत्न सभागृह येथे जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख व त्यांचे सहकारी अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत उद्या मंगळवारी सर्व विभाग प्रमुखांनी व त्यांच्या अधिनस्त सहकारी अधिकारी आणि कर्मचारी तसेच तालूकास्तरावरील अधिकारी, पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांनी एकाच दिवशी जिल्ह्यातील किमान एक हजार अठ्ठावीस गावांना गाव भेटी देऊन कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या सर्व अभियानाच्या कामकाजाचा आढावा घेणे, बाधीतांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, सुरू करण्यात आलेल्या प्रतिबंधीत क्षेत्रात योग्य खबरदारी घेतली जात आहे का याची तपासणी करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे व हात धुणे या त्रिसूत्रीचा प्रभावी अंमल होतो किंवा नाही हे पाहणे, कोरोना नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीने काय उपाय योजना केल्या याचा आढावा घेणे, सर्व दुकानदार भाजी विक्रेते फळ विक्रेते दूधवाले यांच्या कोरणा चाचण्या झाल्या आहेत काय हे पाहणे, प्रत्येक दुकानदारांपर्यंत माझे दुकान माझी जबाबदारी या अभियानाची दशसुत्री पोचली आहे काय ते पाहणे, गावात मास्क शिवाय प्रवेश नाही चे फलक व त्याची अंमलबजावणी होते आहे काय हे पाहणे, विना मास्कची दंडात्मक कारवाई किती लोकांवर झाली याचा आढावा घेणे, जनजागृतीचे कोणते कार्यक्रम हाती घेतले याचा आढावा घेणे, ग्रामपंचायतीमार्फत निर्जंतुकीकरण व स्वच्छता आदींची घेण्यात येणारी काळजी याबाबत आढावा घेणे, गाव भेटीत अधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठका प्रभात फेरी व राबवलेले इतर कार्यक्रम याबाबत तातडीने माहिती द्यायची आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या गाव भेटीचा अहवाल त्याच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करायचा आहे. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.