जिल्हा परिषद ऑनलाइन सभा तिसऱ्यांदा तहकूब

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोलापूर जिल्हा परिषदेची सोमवारी होणारी ऑनलाईन सर्वसाधारण सभा तिसऱ्यांदा तहकूब करण्यात आली आहे. ऑनलाईन सभा घेण्यावरून पदाधिकारी ,सदस्य , प्रशासन यांच्यात समन्वय झाल्यामुळे २९ जुलै रोजी ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असल्याची माहीती जि.प.अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांनी दिली.

    ऑनलाईन सभा घेण्यावरून अध्यक्ष कांबळे यांच्या निजीकक्षात सदस्यांनी गदारोळ केला. ऑफलाईन सभा घेण्याची आग्रही भूमिका सदस्यांनी मांडली. कोरोना प्रतिबंध नियमांची माहीती सभागृह सचिव परमेश्वर राऊत यांनी सादर केली. तडजोडीअंती सभा ऑनलाईन घेण्याचे निश्चित करण्यात आले.

    २९ जुलै रोजी होणाऱ्या ऑनलाईन सभेची तयारी पंचायात समिती येथे करण्यात येणार आहे. पंचायत समितीस्तरावरून सदस्य ऑनलाईन सभेत सहभागी होणार आहेत. ऑफनाईन सभा घेण्यासाठी या पुर्वी सदस्यांनी मुख्यलय प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करित प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सोमवारच्या सभेचे औचित्य साधून एका सामाजिक कार्यकर्त्यांकडून भ्रष्ट कारभाराविरोधात जि.प.मुख्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात येणार होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे स्पष्टीकरण अर्थ समिती सभापती विजयराज डोंगरे यांनी दिले.

    बैठकीदरम्यान सभापती अनिल मोटे, सुभाष माने, आनंद तानवडे, मदन दराडे, रजनी देशमुख, उपस्थित होते.

    ऑनलाईन सभेला विरोध

    जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठी यांनी २९ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेला विरोध कायम ठेवला आहे. ऑनसभेमुळे सदस्यांच्या समस्या सुटत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.