Uddhav Thackeray's statement is indecent to the Chief Minister

नड्डा यांच्या दौ-यापूर्वी मुंबईत वातावरण निर्मिती करण्यासाठी भाजपचे आमदार राम कदम यांनी बंगाल बचाव, ममता हटाव आंदोलन करत जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या दगडफेकीच्या विषयावर जोरदार घोषणाबाजी केली. तर सायन येथे प्रसाद लाड यांच्या कार्यकर्त्यांनी ममता बँनर्जी यांच्या निषेधाच्या घोषणा देत फलक झळकावले होते. 

किशोर आपटे  

मंत्रीपदाला चिकटलेल्या सध्याच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बाळासाहेबांच्या काळातील सैनिक किती प्रमाणात आहेत? असा प्रश्न शिवसेनेच्याच एका माजी मंत्र्याने अनौपचारीक चर्चेत उपस्थित केला. पदे सोडण्याची वेळ आली तर संघटनेसाठी आणि राजकीय स्वार्थापलिकडे असे धैर्य किती लोक दाखवू शकतात? असा सवाल या माजी मंत्र्याने उपस्थित केला. शिवसेनेत उध्दव ठाकरे यांचा शब्द प्रमाण मानला जातो त्यामुळे जे काही चूक होईल त्याचा दोषही या मंत्र्याना नव्हे तर मुख्य नेतृत्वाला घ्यावा लागतो असे वास्तव या नेत्याने उघड केले. त्यामुळे जुन्या आणि नव्या मैत्रीच्या कात्रीत शिवसेनेची घुसमट आणि फरपट तर होणार नाही यासाठी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या संघटनेला मुळापासून विचार करण्याची गरज येत्या काळात निर्माण होणार आहे. हेच भारतीय जनता पक्षाच्या नव्या रणनितीचे गमक आहे. त्याना शिवसेनेला राजकीय धडा शिकवताना ‘नानी याद आयेगी’ असे काही भाजपला करायचे आहे कारण हा त्यांच्या आणि शिवसेनेच्याही राजकीय अस्तित्वाचा प्रश्न असेल!

विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकी नंतर भारतीय जनता पक्षाने आगामी वर्षात होणा-या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. तीन पक्षांसमोर निभाव लागणे कठीण असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपने आपले सर्वस्व पणाला लावत जाहीर झालेल्या ग्रामपंचायत तसेच लवकरच घोषणा होणार असलेल्या पाच महापालिकांच्या निवडणुकांसाठी रणनिती तयार केली आहे. त्यात जुन्या रणनिती प्रमाणे नाराज होवून अन्य पक्षात गेलेल्या तसेच अन्य पक्षात नाराज असलेल्यांना हेरून गळाला लावण्यास सुरूवात केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा १८ तारखेनंतर तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर येण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत दौ-याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर नुकतेच हैद्राबाद मध्ये भाजपने मुंसडी मारत विक्रमी जागा मिळवल्या होत्या. त्या नंतर शिवसेनेच्या तंबूत घबराट असल्याचे दिसून आले. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना मंत्र्याची बैठक घेवून मुख्यमंत्री ठाकरे यांनी हैद्राबादच्या पार्श्वभुमीवर मुंबईत काय तयारी करायची याचा आढावा घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे भाजप कडून राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा देखील तीन दिवस थांबून मुंबईत पदाधिकारी संघटन आणि पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. या दौ-यात ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपशी मुंबई आणि राज्यात समविचारी पक्षांच्या नेत्यांना देखील भेटणार असल्याचे सांगण्यात येते.

हैद्राबाद नंतर आता पश्चिम बंगालच्या निवडणुकांवर भाजपने लक्ष वळवले आहे. या दौ-यावर असताना नड्डा यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने सध्या वातावरण तापले आहे, त्यामुळे मुंबईत देखील नड्डा यांच्या दौ-याच्या निमित्ताने भाजप कडून वातावरण निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या काळात औरंगाबाद, कल्याण-  डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार अश्या मागील काळात राहून गेलेल्या महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत भाजप महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये जागा वाटपावरून होणा-या असंतोषाचा पुरेपूर फायदा उचलण्याच्या तयारीत असल्याचे जाणकार सूत्रांनी सांगितले. तीन पक्षांपैकी शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील अनेक कार्यकर्त्यांना यावेळी दोन्ही कॉंग्रेस समोर आज पर्यंत लढवलेल्या ब-याच जागा सोडण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यातील काही जणांनी भाजपच्या नेत्यांना साद घालण्यास सुरूवात केल्याने शिवसेनेच्या तंबूत घबराटीचे वातावरण आहे. हैद्राबादप्रमाणे औरंगाबाद, कल्याण डोंबिवली मध्ये हिंदू मुस्लिम ध्रुविकरणाचा प्रयत्न करून भाजप सेनेला पारंपारीक मतदारांपासून दुर घेवून जावू शकते आणि त्यात एमआयएम सारख्या पक्षांचा फायदा करून देताना कॉंगेस आणि राष्ट्रवादीला देखील त्यांच्या सेक्यूलर मतांची फोड करून देत दलित मुस्लिमचा वंचित बहुजन पँटर्न राबवून नामोहरम करू शकते. या करीता देवेंद्र फडणवीस आणि भाजप कोअर समितीमध्ये रणनिती तयार असून जेपी नड्डा मुंबईत येवून तीन दिवस या सा-या रणनिती आणि परिस्थितीचा आढावा घेतील. त्यात ते रिपब्लिकन आठवले, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, मनसेचे राज ठाकरे इत्यादी नेत्यांच्या भेटी घेवून वातावरण निर्मिती करतील तर राज्याच्या सत्तेत रमलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना स्थानिक पातळीवर अस्तित्वाच्या लढाईसाठी मैदानात उतरावेच लागणार आहे. भाजप सारख्या महत्वाकांक्षी जुन्या मित्राशी राजकीय वैर तर घेतले आता त्याची किंमत शिवसेनेकडून वसूल करू अश्या अविर्भावात भाजप जोरदार तयारीला लागली आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात राज्यात प्रचंड राजकीय अस्तित्वाचा सत्तासंघर्ष पेटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

नड्डा यांच्या दौ-यापूर्वी मुंबईत वातावरण निर्मिती करण्यासाठी भाजपचे आमदार राम कदम यांनी बंगाल बचाव, ममता हटाव आंदोलन करत जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या दगडफेकीच्या विषयावर जोरदार घोषणाबाजी केली. तर सायन येथे प्रसाद लाड यांच्या कार्यकर्त्यांनी ममता बँनर्जी यांच्या निषेधाच्या घोषणा देत फलक झळकावले होते. तर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी व्टिट करून निषेध करताना त्यांनी मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांना हीच तुमची लोकशाही आहे का?  असा सवाल केला आहे. त्यांनी व्टिट मध्ये म्हटले आहे की, नड्डा आणि कैलाश विजतवर्गिय यांच्यावरील भ्याड आणि लाजीरवाण्या हल्ल्यामागे तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडाचा हात आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.या बाबत कठोर कारवाई करण्यात यावीअशी मागणी देखील त्यांनी केली.

येत्या काळात होणा-या स्थानिक स्वरांज्य संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजपने कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. या रणनितीचा भाग म्हणून भाजप सोडून गेलेल्या माजी आमदार पदाधिका-यांना परत फिरा अशी साद घालण्यासही सुरूवात झाली आहे. उदाहरण म्हणून वर्षभरापूर्वी शिवसेनेचा झेंडा हाती धरलेले नाशिक मधील आमदार बाळासाहेब सानप यांना पक्षात परत बोलवण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना असा प्रवास करणा-या सानप यांना महापालिका निवडणुकांच्या आधी पक्षात परत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांत अनिल गोटे, एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड अश्या जनसंघाच्या काळापासून पक्षात असणा-या दिग्गज नेत्यांनी पक्षाला राम राम केला. त्यामुळे आता जुन्या-जाणत्या आणि पक्ष सोडून गेलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांना साद घालण्याची प्रक्रिया भाजपने सुरु केली आहे. बाळासाहेब सानप हे भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर ठरले होते. २०१४मध्ये नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात सानप आमदार होते.

दुसरीकडे भाजपच्या रणनितीचा अंदाज आलेल्या राष्ट्रवादीने देखील अनेक पातळ्यांवर भाजपला त्यांच्याच तंत्राने दे धक्का करण्याची तयारी केली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता मोठ्या प्रमाणात भाजप मध्ये गेलेल्यांना परत माघारी बोलावून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत जश्यास तसे उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. विधान परिषदेच्या निवडणूक प्रचारा दरम्यान राज्यभर फिरलेल्या पक्षाच्या नेत्यांनी त्या त्या भागातल्या स्थितीचा आढावा घेतला असून भाजप सोबत गेलेल्या महादेव जानकर यांच्या सारख्यांना सोबत घेण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. दुसरीकडे राज्यातील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून राजकीय दबावाची खेळी करत भाजपच्या इडीकाडीच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात मागील काळातील जलयुक्त शिवार सारख्या योजनांची चौकशी करण्याचा तसेच नगर विकास विभागातील जुन्या प्रकरणांची चौकशी करण्याचा मनसुबा रचत सत्ताधारी आघाडीने दबाव नितीला तश्याच पध्दतीने हाताळण्याची स्पर्धा सुरू केली आहे. ही स्पर्धा सत्ताधारी शिवसेनेची मात्र घुसमट करणारी ठरू शकते, कारण उध्दव ठाकरे यांना जुन्या आणि नव्या मित्रांना देखील सांभाळून घेत पुढे जाण्याची कसरत त्यातून करावी लागत आहे.

केंद्रात बसलेल्या जुन्या मित्रांना ते नाराज करू शकत नाहीत तर राज्यात सोबत घेतलेल्या नव्या मित्रांच्या राजकीय महत्वाकांक्षा त्यांना गप्प बसू देत नाहीत अश्या स्थितीत शिवसेनेची नव्याने राजकीय घुसमट आणि फरपट होण्यास सुरूवात झाली आहे. त्याबाबत जितक्या लवकर शिवसेनेच्या सत्तेत रमलेल्या मंत्र्याना आणि त्यांच्या नेत्यांना जाग येईल तितकी ही बाब त्यांच्या आणि भाजपच्या हिताची असेल. विधान परिषदेच्या निवडणूक निकालांनतर हेच अधोरेखीत करण्याचा प्रयत्न विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दोन्ही कॉंग्रेसच्या आणि भाजपच्या रस्सीखेच मध्ये शिवसेनेचा अमरावतीमध्ये असलेला एकमात्र उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला. त्यामुळे सेनेला सोबत घेवून भाजपला अस्मान दाखविण्याचा दोन्ही कॉंग्रेसचा प्रयत्न सफल झाला. तरी शिवसेनेला त्यातून शोभेच्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाच्या हस्तिदंती आराशीपलिकडे राजकीय दृष्ट्या काहीच फायदा  झाला नाही. याच गोष्टीवर शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत विचार विनीमय करण्यात आला.

मात्र मंत्रीपदाला चिकटलेल्या सध्याच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बाळासाहेबांच्या काळातील सैनिक किती प्रमाणात आहे? असा प्रश्न शिवसेनेच्याच एका माजी मंत्र्याने अनौपचारीक चर्चेत उपस्थित केला. पदे सोडण्याची वेळ आली तर संघटनेसाठी आणि राजकीय स्वार्थापलिकडे असे धैर्य किती लोक दाखवू शकतात? असा सवाल या  माजी मंत्र्याने उपस्थित केला. शिवसेनेत उध्दव ठाकरे यांचा शब्द प्रमाण मानला जातो त्यामुळे जे काही चूक होईल त्याचा दोषही या मंत्र्याना नव्हे तर मुख्य नेतृत्वाला घ्यावा लागतो असे वास्तव या नेत्याने उघड केले. त्यामुळे जुन्या आणि नव्या मैत्रीच्या कात्रीत शिवसेनेची घुसमट आणि फरपट तर होणार नाही यासाठी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या संघटनेला मुळापासून विचार करण्याची गरज येत्या काळात निर्माण होणार आहे. हेच भारतीय जनता पक्षाच्या नव्या रणनितीचे गमक आहे. त्याना शिवसेनेला राजकीय धडा शिकवताना ‘नानी याद आयेगी’ असे काही करायचे आहे. कारण हा त्यांच्या आणि शिवसेनेच्याही राजकीय अस्तित्वाचा प्रश्न असेल. तूर्तास इतकेच