फोटो क्रेडिट-istock
प्रगती करंबेळकर/पुणे : बालदिनाच्या निमित्ताने मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार होत असताना, बालरंगभूमी हा त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, समाजजाणीव आणि सर्जनशीलतेचा महत्त्वपूर्ण मार्ग ठरत आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून, मुलांना संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनविण्याची दिशा देणारे सशक्त साधन आहे. नाटकाच्या माध्यमातून मुले केवळ संवाद आणि अभिनय शिकत नाहीत, तर टीमवर्क, वक्तृत्व, सहकार्य, आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीवही आत्मसात करतात. त्यामुळे बालरंगभूमी ही मुलांची केवळ कलाकेंद्र नव्हे, तर संस्कार आणि सर्जनशीलतेची शाळा बनली आहे.
हेही वाचा : Asia Cup Rising Stars 2025 : वैभव सूर्यवंशीचे शतक फळाला! भारत अ संघाने UAE ला 148 धावांनी लोळवले
सध्या महाराष्ट्रात बालरंगभूमी परिषद, विविध बालनाट्य संस्था आणि शैक्षणिक संस्थांद्वारे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. या संस्थांमधून सामाजिक विषयांवरील बालनाट्ये जसे की पर्यावरण संवर्धन, लिंगसमता, सामाजिक भेदभाव, अपंगत्वाबाबतची जाणीव अशा विषयांवर आधारित प्रयोग सादर केले जात आहेत. या माध्यमातून मुलांना समाजातील वास्तव आणि त्यातील आपली भूमिका समजते.
बालरंगभूमी परिषदेचे सल्लागार प्रकाश पारखी सांगतात, गेल्या ४७ वर्षांपासून ही संस्था सातत्याने कार्यरत आहे आणि हजारो मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास यामधून घडला आहे. रंगभूमी मुलांना स्पष्ट शब्दोच्चार, आत्मविश्वास आणि सर्जनशील विचार करण्याची प्रेरणा देते. आता तंत्रज्ञानामुळे प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीताचे ज्ञान मुलांना सहज मिळते. मोबाईल, ध्वनीमिश्रण आणि लाईटिंगसारख्या गोष्टी मुलं उत्साहाने शिकतात, त्यामुळे नाटकांचा दर्जा अधिक उंचावला आहे.
बालरंगभूमीचा एक मोठा फायदा म्हणजे एकाच विषयावर जवळजवळ महिनाभर काम करताना मुले त्या विषयाशी एकरूप होतात, असे सागर लोधी सांगतात. ते पुढे म्हणाले, एकदा आम्ही अडखळत बोलणाऱ्या व्यक्तींच्या समस्येवर नाटक सादर केले होते. त्यावेळी मुलांनी सामान्य आणि असामान्य यातील सीमारेषा समजून घेतली. इतकी सखोल जाण निर्माण होणे हे बालनाट्याचेच यश आहे.
अशा विषयांमुळे मुलांमध्ये सामाजिक संवेदनशीलता आणि सहानुभूतीची बीजे पेरली जातात. जे नाटक मुलांसाठी तयार केले जाते, ते समाजासाठीही विचार करायला लावते. अशा रीतीने बालरंगभूमी ही मुलांच्या विचारांची शिदोरी तयार करते.
बालरंगभूमीमुळे एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग तयार होतो. लहान वयातच रंगभूमीचा अनुभव घेतलेल्या मुलांची पिढी पुढे जाऊन अधिक संवेदनशील आणि संस्कारित समाज घडवते. जरी ते पुढे जाऊन कलाकार झाले नाही तरी समाज जाणिवेमुळे ते एक सजग नागरिक होतात.
बालविश्व पूर्णपणे बदलले आहे. पालक म्हणून आपल्यालाही या बदलाची जाणीव ठेवण्याची आणि मुलांच्या सर्जनशीलतेला पाठबळ देण्याची गरज आहे. बालदिन हा फक्त आनंदाचा नव्हे, तर नव्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा दिवस ठरावा. सागर लोधी, आकांक्षा बालरंगभूमी






