अमित शाह – पवार भेटीमुळे खळबळ

राजकारणामध्ये कोणीही कुणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो. वेळप्रसंगी विरोधकांसोबतही मैत्री केल्या जावू शकते. अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राकांचे अध्यक्ष शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांची भेट झाल्याचे वृत प्रसारित झाले आणि बहुतेक राजकारण्यांना धक्काच बसला. पवार-शाह भेटीमुळे खळबळ उडणे स्वाभाविकच आहे. वस्तुस्थिती तर अशी आहे की, अमित 'शाह आणि शरद पवार हे दोन्ही नेते शिवसेना आणि काँग्रेसच्या भूमिकेवर नाराज आहेत.

    भाजप आणि राकाँच्या या नेत्यांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या राजकारणावर निश्चितच चर्चा झाली असणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या मार्गदर्शनातच राज्याचा कारभार करीत आहेत. परंतु महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिळ देशमुख यांच्या प्रकरणावरून शिवसेनेने राकाँवर जी टीका केलेली आहे, त्यामुळे शरद पवार नाराज झाले आहे. त्यांचे नाराज होणे स्वाभाविकच आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार टिकून आहे ते केवळ शरद पवार यांच्यामुळेच.

    महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व जरी उद्धव ठाकरे करीत असले तरी राकाँ नेते पवार यांच्यामुळेच सरकार स्थिर आहे. तसे तर सर्वांनाच माहित आहे की, शरद पवार एकाचवेळी अनेक ठिकाणचा अचूक वेध घेण्यात तरबेज आहेत. राकाँला शिवसेनेची भूमिका आवडली नाही तर राकाँ भाजपसोबतही आघाडी करू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे, परंतु ही फार दूरची गोष्ट आहे.

    उद्योगपती गौतम अदानी यांच्या कुटुंबातील विवाह समारंभासाठी शरद पवार आणि प्रफुल्छ पटेळ अहमदाबादला गेले होते. या विवाह सोहळ्यासाठी अमित शाह हे सुद्धा आले होते. तेथे एका फार्महाऊसवर या नेत्यांची गुप्त बैठक झाली, असे बोलल्या जात आहे. या भेटीसंदर्भात शाह यांना जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले, सर्वच गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात. या नेत्यांची भेट झाली किंवा नाही या वृताबाबतही निश्चितपणे सांगता येणार नाही. शाह यांच्या वक्तव्यामुळे या भेटीचे रहस्य आणखीच गूढ झालेले आहे.