दिल्लीत आता नायब राज्यपालाचे सरकार, लोकनियुक्त सरकार बनणार अधिकार शून्य

केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला अत्यंत सीमित अधिकार आहेत आणि आता केंद्र सरकारने दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या सरकारसंबंधीचे विधेयक संसदेत पारित करून केजरीवाल सरकारला अधिकारशून्य बनविले आहे.

    राज्यसभेत जेव्हा हे विधेयक मंजुरीसाठी सादर करण्यात आले तेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या विधेयकाला प्रचंड विरोध केला. विरोधकांच्या विरोधानंतरही विधेयक पारित करण्यात आले. काँग्रेस, शिवसेना, राकाँ, आप, द्रमुक, माकप, राजद, तृणमूल काँग्रेस, टीडीपी आणि अकाली दल या पक्षांनी दिल्लीसाठी हा ‘काळा दिवस’ असल्याचे जाहीर केले. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भाजपा आता नायब राज्यपालांच्या माध्यमातून दिल्लीचे सरकार चालवू इच्छित आहे.

    ‘आप’चे नेते संजय सिंह यांनी म्हटले आहे कौ, दिल्ली विधानसभेच्या ९० टक्के जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाला अधिकारविहीन करण्याचा कुटिल डाव केंद्र सरकारने रचला आहे. जर नायब राज्यपाळच दिल्लीचे सर्वेसर्वा राहील तर तेथे जनतेने निवडून दिलेल्या सरकारची आवश्यकताच राहणार नाही. जर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि विधानसभाच अधिकारविहीन झाले तर तेथे सरकार असूनही नसल्यासारखेच असेल.

    यापूर्वीही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अधिकाराच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले आहे. माजी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यासोबत केजरीवाल यांचे मतभेद होते. त्यानंतर अनिल बैजल यांची दिल्लीच्या नायब राज्यपालपदावर नियुक्ती करण्यात आली. सद्यपरिस्थिती तर अशी आहे की, दिल्लीच्या पोलिस यंत्रणेवर राज्य सरकारचे नियंत्रण नाही. आयएएस व आयपीएस अधिकारीही दिल्ली सरकारला जबाबदार नाहीत. सर्व अधिकार नायब राज्यपालांकडे केंद्रित झालेले आहेत.

    केजरीवाल सरकारने दिल्लीच्या जनतेचे बीजनिल माफ केले, मोहल्ला क्लिनिक सुरू केले, सरकारी शाळांच्या शैक्षणिक दर्जात सुधारणा केल्यात, यामुळे केजरीवाल यांची लोकप्रियता वाढलेली आहे. केजरीवालांची ही लोकप्रियता भाजपाला सहन होत नाही आणि यामुळेच त्यांना अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी या विधेयकाला घटनाविरोधी म्हटले आहे. केजरीवालांनी म्हटले आहे की, भाजपाने दिल्लीच्या जनतेचा विश्‍वासघात केलेला आहे. जनतेने निवडून दिलेल्या सरकारला शक्तिहीन करण्याचा हा प्रयत्न आहे.