नेहमी स्मरणात राहतील प्रणव मुखर्जी

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका कर्तव्यदक्ष सुपुत्राला मुकला आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. अन् मृत्यूने शेवटी आपला डाव साधला.

प्रणव मुखर्जी (Pranav Mukharji) राष्ट्रपती होण्यापूर्वी ते कॉंग्रेसच्या मोजक्या बड्या नेत्यांपैकी एक होते. अर्थ व विदेश मंत्रालयाचा कारभार सांभाळताना त्यांनी देशाला विद्वतेचा परिचय देऊन दोन्ही खात्यांमध्ये कर्तव्यदक्ष मंत्री स्वरूपात आपला ठसा उमटविला होता. १९८४ साली जेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत प्रणव हे सर्वात पुढे होते. राजकीय जीवनात त्याच्यासोबत पंतप्रधानपदाने अक्षरश: ‘खो-खो’ खेळच केल्याचे दिसले. ते या पदावर येताना दिसताच त्यांना या ना त्या कारणाने “खो” मिळत गेला. हा सारा भाग त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पचविला, पण त्यांचे कॉंग्रेस प्रेम कायम दिसले. पंतप्रधान मिळाले नाही म्हणून ते कधी निराश झाले नाहीत. कॉंग्रेसने मग त्यांना थेट राष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनविले. सर्वच राजकीय पक्षात त्यांनी विद्वतेचा ठसा उमटविल्यामुळे त्यांना अनेक विरोधी पक्षाची साथही मिळाली. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी कुणावर भडक स्वरूपाचे आरोप केलेत असे दिसले नाही.

राष्ट्रपतिपद सांभाळल्यानंतर ते सर्वांना समान न्याय देताना दिसले. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी बहुमताने निवडून आल्यानंतर पुढील मार्गदर्शनासाठी त्यांनी प्रथम प्रणवदांची भेट घेतली. ४ वर्षांपूर्वी त्यांनी द टरबुलेंट इमर्स हे आत्मकथा स्वरूपात पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकल्यामुळे ते कॉंग्रेस पक्षापासून दुरावले होते. जानेवारी १९८५ मध्ये राजीव गांधी जेव्हा पंतप्रधानपदावर आलेत तेव्हा यात ग्यानी झैलसिंग यांची फार मोठी भूमिका होती. तेव्हाही ते पंतप्रधान पदाचे दावेदार होते. इंदिरा गांधींच्या काळात ते त्यांच्या कॅबिनेटमध्ये नेहमीच क्रमांक २ चे मंत्री राहीले आहेत.

वेंकटरमन व नरसिंहरावांसारखे वरिष्ठ नेते कॅबिनेट मंत्री असताना जेव्हा केव्हा इंदिरा गांधी विदेश दौऱ्यावर जायच्या तेव्हा कॅबिनेटची अध्यक्षता प्रणव मुखर्जीच करीत होते. त्यांच्या जीवनात २७ एप्रिल १९८६ हा दिवस अत्यंत दु:ख देणारा राहिला. त्यांना कॉंग्रेस पक्षाबाहेर पडण्यास बाध्य केल्या गेले होते. कॉंग्रेस पक्षात अतिशय विद्वान नेते असूनही त्यांची बरोबरी गाठणे अनेकांना जड जात होते. त्यांनी कॉंग्रेस पक्षातून बाहेर समाजवादी कॉंग्रेस बनविली होती. पण त्यानंतर त्यांची कमतरता पक्षाल जाणवू लागली. कॉग्रेस पक्षांतर्गतचे गंभीर चिंतनच थांबलेले होते. नरसिंहराव यांची जेव्हा उंची वाढली तर प्रणवदाही कॉंग्रेसमध्ये मजबूत झाले. अण्णा हजारेंच्या आंदोलनात वाटाघाटी करण्यासाठी प्रणवदांनाच कॉंग्रेसने पुढे केले होते. गेल्या वर्षी भारत सरकारने त्यांना भारतरत्न स्वरूपात गौरविले. सरकारने त्यांना प्रथम राष्ट्रपती डॉं. राजेंद्रप्रसाद, डॉं. एस. राधाकृष्णन, डॉ. झाकिर हुसेन व व्ही.व्ही. गिरीच्या पंगतिला बसविले.