नकली नोटांची गंभीर समस्या

आपल्या देशात नकली नोटांच्या संख्येत तीन पटीने वाढ होणे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. नोटांची छपाई करताना कितीतरी नवीन फिचर्स त्या नोटांमध्ये असतात.

    नकली नोटा काढणे कोणालाही शक्‍य होऊ नये, म्हणून नवीन नोटांमध्ये हे फिचर्स समाविष्ट करण्यात येते, परंतु नकली नोटांची छपाई करणारे अत्यंत चलाख असतात. ते कोणत्याही नवीन नोटांची हुबेहूब नक्कल करून छपाई करतातच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटबंदी लागू केली होती. ही नोटबंदी करण्यामागे नकली नोटा चलनातून बाहेर काढणे, काळा पैसा नियंत्रित करणे आणि दहशतवादावर लगाम लावणे इत्यादी उद्देश्य होते.

    तेव्हा असा आरोप करण्यात येत होता की, भारताची अर्थव्यवस्था उद्धवस्त करण्यासाठी पाकिस्तान नकली नोटा छापून त्या काठमांडूमार्गे भारतात पाठवित आहे आणि या नोटांच्या छपाईसाठी पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर कमिशन सुद्धा देत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सरकारने नवीन नोटांची छपाई केली, परंतु या नवीन नोटांचीही नक्कल करणे सुरू झाले. वॉटर मार्क आणि चांदीचा धागाही नोटांमध्ये टाकण्यात आळा.

    नवीन नोटांच्या छपाईसाठी खास शाई सुद्धा वापरण्यात आली, परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. कारण या नोटांचीही नक्कल करण्यात आली. नकली नोटांची संख्या वाढू लागली. नकली नोटा सरकार आणि रिझर्व्ह बँकेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. नवीन नोटा ह्या अगोदरच्या नोटांपेक्षा ज्यास्त सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत असतानाच नकली नोटांची संख्या वाढू लागली आहे.

    इ.स. २०१९ मध्ये २०० रूपयांच्या मालिकेतील ज्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत त्या नोटांची संख्या १५१ टक्के इतकी होती. ५०० रूपयांच्या नव्या मालिकेतीळ ज्या नकली नोटा पकडण्यात आल्या आहेत ती संख्या ३७ टक्क्याने वाढलेली आहे. गतवर्षी ८ लाख ३४ हजार ९४७नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून इ.स. २०१९  या वर्षामध्ये ज्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत त्यापेक्षा ही संख्या २८० पटीने ज्यास्त आहे. नकली नोटा ही अत्यंत गंभीर समस्या आहे. नकली नोटांची छपाई करणा-या टोळीला जेरबंद करण्यासाठी केंद्र सरकारने तत्परता दाखविणे आवश्यक आहे.