uddav thackery and sharad pawar

भाजपाला महाराष्ट्राच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे. या आघाडीमध्ये कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत राकाँ आणि काँग्रेससारखे धर्मनिरपेक्ष पक्षही सहभागी झालेले आहेत.

शिवसेना (Shiv Sena) नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील ‘महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi Government) २५ वर्षेपर्यंत सत्तेत राहील, असे सूतोवाच राकाँ नेते शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी केले आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे आघाडीतील सहभागी पक्षांची हिंमत वाढलेली आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसला आणखी बळ मिळालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्तुती करताना शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री बोलतात कमी पण ते चतुर राजकारणी आहेत. उद्धव ठाकरे यांनीही पवारांची प्रशंसा करताना म्हटले आहे की, पवारांच्या मार्गदर्शनामुळेच अनेक संकटांचा सामना करण्याचे बळ आपल्याला मिळाले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आपल्याला मोलाची मदत तट झालेली आहे. याबद्दल ठाकरे यांनी उभयतांचे आभार मानले आहे.

भाजपाला महाराष्ट्राच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे. या आघाडीमध्ये कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत राकाँ आणि काँग्रेससारखे धर्मनिरपेक्ष पक्षही सहभागी झालेले आहेत. या आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष कनिष्ठ सहयोगी पक्ष असला तरी या पक्षाला सत्तेचे सुख मात्र मिळत आहे. २५ वर्षेपर्यंत राज्यात महाआघाडी सरकार सत्तेत राहील, अशा शुभेच्छा पवारांनी दिल्या असल्या तरी राजकारणात नेहमी बदल होत असतात. जनादेश नेहमी सारखा राहत नसतो. आगामी २५ वर्षांत अनेक निवडणुका होतील आणि अनेकांचे भाग्य उजळतील.

सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता असेच म्हणावे लागेल की, शिवसेना, राकाँ आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करून राज्याची सत्ता तर मिळविलीच, परंतु भाजपाच्या सर्व आशा-अपेक्षा धुळीस मिळविल्या आहेत. राज्यात स्थैर्य निर्माण करण्यासाठी या आघाडीतील घटक पक्षांनी आपसातील मतभेद बाजूला सारलेले आहे. लवकरच आमच्या आमदारांची संख्या ११५ वरून १५० होईल व आम्ही पुन्हा एकदा सत्तेत येऊ असे भाजपा नेते म्हणत असले तरी गेल्या वर्षभरापासून आघाडीतील घटक पक्ष एकजुटीने सरकार चालवित आहेत. महाआघाडीमध्ये असंतोष नाही. शरद पवार हे कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या राकाँमध्ये फूट पडू देणार नाही. पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात रस नसून त्यांना राष्ट्रीय राजकारण करायचे आहे, त्यामुळे आता पवारांचे पुतणे अजित पवार यांच्यासमोर कोणतेही आव्हान नाही. भाजपाने अजित पवारांना रोखण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे भविष्य काका शरद पवार यांच्यासोबत राहूनच सुरक्षित राहणार आहे.