लोकशाहीची अशीही थट्टा, ५ वर्षांत ५ मुख्यमंत्री आता २० उपमुख्यमंत्री…

काही असे नेते आहेत की, जे स्वार्थी असतात आणि आपल्या स्वार्थी राजकारणाने लोकशाहीची थट्टा करतात.

    सर्वांनाच माहीत आहे की, दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि 5 वर्षांसाठी सरकारची निवड करण्यात येते. परंतु, काही स्वार्थी नेते सत्तेला ‘द्रौपदी’ समजून 5 वर्षांसाठी 5 मुख्यमंत्री आणि 20 उपमुख्यमंत्री करण्याचे विचित्र दावे करतात. असे बोलण्यात काय अर्थ आहे? उत्तरप्रदेशात पुढीलवर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. येथील सुहेलदेव भारतीय समाजपक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी ‘भागीदारी संकल्प मोर्चा’ स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी निषाद पक्षाचे अध्यक्ष डॉ. संजय निषाद यांना असे आश्वासन दिले की, संकल्प मोर्चाचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लावण्यात येईल. इतकेच नव्हे तर, राजभर यांच्या काही कार्यकर्त्यांना सांगितले की, दरवर्षी वेगवेगळ्या जातीचे मुख्यमंत्री केले जाईल. पहिल्या वर्षी संजय निषाद, दुसऱ्या वर्षी राजभर, तिसऱ्या वर्षी पटेल आणि चौथ्या वर्षी मौर्य यांना मुख्यमंत्री करण्यात येईल. प्रत्येक वर्षी 4 उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या जातीचे राहतील, असा विचार भागीदारी संकल्प मोर्चा करीत आहे. राजभर यांनी मात्र जनकल्याणाचा कोणताही विचार केलेला दिसत नाही. सर्व मिळून सत्तेचे सुख भोगणे, असाच त्यांचा विचार दिसतो.

    5 वर्षांत 5 मुख्यमंत्री झाले तर प्रत्येकजण जास्तीत-जास्त भ्रष्टाचार करतील आणि जनतेच्या कल्याणाबाबत कुणीही विचारच करणार नाही. सत्ता मिळाली तर जास्तीत-जास्त लूट करण्याचाच ते विचार करतील. कारण त्यांचा कार्यकाळ केवळ वर्षभराचाच असेल, तेव्हा या कालावधीत जास्तीत-जास्त सरकारी खजिना लुटून तो रिक्त करण्याचाच प्रत्येकजण विचार करेल. शोधूनही त्यांच्या कारकिर्दीत राज्यात राजकीय स्थैर्य सापडणारच नाही. एक मुख्यमंत्री दुसऱ्या मुख्यमंत्र्यांची धोरणे आणि कार्यक्रम रद्द करून स्वत:च्या धोरणानुसारच राज्यकारभार करतील. भाजपाकडे सत्तेची भीक मागणारे नेते भागीदारी संकल्प मोर्चाच्या सरकारमध्ये मालक बनून आपल्या समाजाच्या हिताचे संवर्धन करतील. राजभर यांच्या जातीवादी राजकारणाचा विचार लोकशाहीला स्मशानभूमी बनविल्याशिवाय राहणार नाही. राजभर यांच्या या राजकारणातून केवळ स्वार्थच दिसून येतो.