पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री

छत्तीसगड, पंजाब, राजस्थान या काँग्रेसशासित राज्यातील राजकीय परिस्थिती जवळजवळ सारखीच आहे. या राज्यातील मुख्यमंत्री पक्षातील असंतुष्टांचा सामना करीत आहेत. परिणामी राज्यांमध्ये अस्थिरता वाढू लागली आहे. याचा विपरीत परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत आहे.

  इं काँग्रेस पक्षश्रेष्ठी राज्यामध्ये जे अस्थिर वातावरण निमाण होत आहे, याकडे मात्र गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. असे वाटते की, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना असंतुष्टांशी लढण्यासाठी मोकळे सोडून देण्यात आले आहे. पक्षांतर्गत हा जो असंतोष पसरत आहे तो दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठी काहीही करताना दिसत नाही.

  अशा परिस्थितीत ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, ती राज्ये सुद्धा काँग्रेसच्या हातातून जाण्याची शक्‍यता निर्माण झालेली आहे. या असंतुष्टांना कोणाचे प्रोत्साहन मिळत आहे? मुख्यमंत्र्यावर दबाव ठेवण्यासाठी या असंतुष्टांना प्रोत्साहन तर दिल्या जात नाही ना? पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे सल्लागार मालविंदरसिंह माली यांनी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या सरकारला ‘अलिबाबा ‘चालिस चोर’ असे म्हटले आहे.

  ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांच्यावर त्यांनी ‘लुधियाणाचा पळपुटा’ या शब्दात शेलकी टीका केलेली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांची त्वरित उचलबांगडी करा, अशी मागणी बंडखोर मंत्री आणि काही आमदारांनी पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांच्याकडे केली, परंतु रावत यांनी मात्र आगामी पंजाब विधानसभेच्या निवडणुका कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वातच लढविण्यात येईल, असे स्पष्ट केले.

  कॅप्टनच्या समर्थनार्थ त्यांची खासदार पत्नी परनीत कौर या सुद्धा सरसावल्या आहेत. पंजाबमध्ये पक्षांतर्गत जी बंडखोरी होत आहे, याला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हेच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. जेव्हापासून नवज्योतसिंग सिद्ध पक्षात आले, तेव्हापासून पंजाब काँग्रेसमध्ये कलह सुरू झाला आहे, असेही त्या म्हणाल्या.

  जर कॅप्टनबाबत काही समस्या होत्या तर ४ वर्षेपर्यंत ते कसे शांत बसले ? छत्तीसगडमध्ये आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव मुख्यमंत्री होण्यासाठी आतुर झालेले आहेत. त्यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची या संदर्भात भेटही घेतली आहे. सिंहदेव यांच्या समर्थकांचे असे म्हणणे आहे की, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री होण्यावर सहमती झाली होती, तेव्हा आता भूपेश बघेल यांच्याऐवजी सिंहदेव यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविले पाहिजे.

  दरम्यान छत्तीसगडचे प्रभारी पी.एल पुनिया यांनी मात्र राज्याचे मुख्यमंत्री बदलण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले. दुसरीकडे मुख्यमंत्री बघेल यांनी म्हटले आहे की, राहुल आणि सोनिया जोपर्यंत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडण्यास सांगणार नाही, तोपर्यंत आपल्या या पदावर राहू. जेव्हा पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्रिपद सोडण्यास सांगतील, तेव्हा आपण त्वरित मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ. राजस्थानमध्येही मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे.