१० वी १२ वी ची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा योग्य निर्णय

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १०वी १२ वीच्या परीक्षा ' ऑफलाईन' घेण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामध्ये आता कुठलाही बदल होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात येत आहे.

    गतवर्षी कोरोना महामारीमुळे १०वीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता हा निर्णय घेतेवेळी शिक्षणमंत्र्यांवर तत्कालीन परिस्थितीचा दबाव होता. आतासुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यात कोरोना महामारीची दुसरी काट आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये १०वी १२ वीच्या परीक्षेवर प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे, परंतु शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मात्र अत्यंत दृढतेने तर्कसंगत निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रात सुमारे १५ ते १७ लाख विद्यार्थी दरवर्षी १०वी १२वीची परीक्षा देत असतात.

    या परीक्षांचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर मागी ३ वर्षांपासून कोरोना महामारीचे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत ऑनलाईन परीक्षा घेण्यावरून मोठा विवाद उत्पन्न होऊ शकतो आणि परीक्षा प्रणालीवर संशय निर्माण होण्याची शक्‍यता असते, त्यामुळेच शिक्षणमंत्र्यानी ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यावेळी परीक्षा सुरू होईल तेव्हा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर मास्क लावून यावे लागेल. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवावा लागेल.

    ज्या शाळेत विद्यार्थी शिकत होते, तेथेच त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र राहतील. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्धा तास जास्त वेळ देण्यात येणार आहे. हे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यासाठी अत्यंत तणाव पूर्ण राहिळे आहे, परंतु उत्तरपत्रिका लिहिण्याची त्यांना नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास जास्त वेळ मिळत असल्यामुळे त्यांच्यावरील तणाव काहीसा कमी होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी अभ्यासांवर लक्ष केंद्रित करून परीक्षेची तयारी करण्याची नितांत आवश्यकता आहे.