मुख्यमंत्र्यांना माहिती दिली नव्हती काय? पहिल्या दिवशीची घोषणा दुसर्‍या दिवशी कशी बदलली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून याचा थेट परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंटवर होणार आहे.

सध्या तरी राज्यात लॉकडाऊन किंवा रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा कोणताही विचार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद या कार्यक्रमात सांगितले होते, परंतु दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे. यावरून असे वाटते की, मुख्यमंत्र्यांना राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत पुरेशी माहिती दिली जात नाही. मुख्यमंत्र्यांना कोरोनाच्या स्थितीबाबत अंधारात ठेवले जात आहे का? वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनाच्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना योग्य ती माहिती दिली नाही का ? असे जर असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या गर्दीचा विचारही केला नसावा, म्हणून तर मुख्यमंत्र्यांनी दुसर्‍या दिवशी घेतलेल्या बैठकीनंतर सांगितले की २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला हाताळण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या स्वागत कार्यक्रमावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून याचा थेट परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंटवर होणार आहे. या कालावधीमध्ये हॉटेल्स मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात. या दरम्यान हॉटेल मालकांची चांगली कमाईसुद्धा होत असते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी लागू केल्यामुळे हॉटेल मालक नाराज झाले आहेत. कोरोना केवळ शहरातच आहे का, ग्रामीण भागात कोरोनाची साथ नाही का? असा सवाल या हॉटेल मालकांनी मुख्यमंत्र्यांना विचारलेला आहे. शहरी भागात १४ दिवसपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून या संचारबंदीमुळे कोणीही नागरिक रात्री ११ वाजल्यानंतर घराबाहेर पडणारच नाही. जे लोक रात्री ११ वाजेनंतर बाहेर पडतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. रात्रीच्या या संचारबंदीमधून ग्रामीण भागाला वगळण्यात आल्यामुळे या क्षेत्रातील रिसॉर्ट, बार, रेस्टॉरंट आणि फार्महाऊसचे संचालक मात्र खूश आहेत.

शहरातील लोक पार्टी करण्यासाठी ग्रामीण भागातील बार, रेस्टॉरंटमध्ये येतील, त्यामुळे या बार रेस्टॉरंट मालकाची कमाई वाढेल. परंतु हे लोक जेव्हा पार्टी करून घरी परततील, तेव्हा पोलिस त्यांना पकडतील व त्यांच्यावर कारवाई करती, याचीही भीती आहे. त्यामुळे ख्रिसमसचा आनंदोत्सव असो की, नवीन वर्षांची पार्टी यावर कर्फ्यूने पाणी फेरले आहे. नगरपालिका क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत दररोज रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहील. इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला असून यामुळे कोरोनाचा ७० टक्के जास्त प्रसार होतो. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे. पहिल्या दिवशीची घोषणा दुसर्‍या दिवशी बदलल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.