आम्ही करून दाखवलं : आता तुमची बारी! दोन मंत्री देणार राजीनामे, कर्नाटकात भाजपच्या अडचणीत वाढ

येदियुरप्पासारख्या ज्येष्ठ नेत्याला बाजूला सारून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी राज्याचे जुने नेते एस.आर. बोम्मई यांचे पुत्र बसवराज बोम्मई यांची निवड करून भाजपने येदियुरप्पासारख्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली. असे करून भाजपने हे दाखवून दिले की, पक्षाचे केंद्रीय नेते जसे म्हणतील, त्याचप्रमाणे होईल.

    भाजपशासित राज्यांचा कारभार केंद्रीय नेत्यांच्या मर्जीप्रमाणे चालतील असे दाखविण्याचा भाजपने प्रयत्न केलेला आहे. हे मात्र तेवढेच खरे आहे की, येदियुरप्पाचे वय ७८ वर्ष आहे आणि ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे नेते भाजप पक्षश्रेष्ठींना पक्षाच्या राजकारणात नको आहेत. या नियमानुसार भाजपने लिंगायत समाजाच्या येदियुरप्पासारख्या प्रभावी नेत्यापासून स्वतःची सुटका करून घेतली.

    याच नियमानुसार अडवाणी, जोशी आणि शांताकुमार या बुजुर्ग नेत्यांना भाजपने दूर केले. तसे तर आगामी इ.स. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी ७४ वर्षांचे होतील आणि त्यानंतर त्यांना एक टर्म आणखी मिळाली तर ते ७९ वर्षांचे होतील, मग काय भाजप मोदींना अपवाद समजतील काय? येदियुरप्पांची कोणतीही अट भाजपने मान्य केली नाही. त्यांच्या मुलाला राज्य सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आले नाही.

    कर्नाटकमध्ये आपली मजबूत पकड असल्याचे दाखविण्यासाठी बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लावण्यात आली. परंतु बोम्मई यांची पुढील वाटचाल मात्र अवघड आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील आनंदसिंह आणि एम.टी. नागराज यांनी मंत्रिपदाचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदसिंह यांनी तर सार्वजनिक बांधकाम खाते न मिळाल्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा पाठवून दिला.

    मुख्यमंत्री बोम्मई यांनी सार्वजनिक बांधकाम खाते त्यांचे मित्र सी.सी. पाटील यांना दिले आहे. नागराज हे गृहनिर्माण खाते मिळावे यासाठी अडून बसले आहेत. जोपर्यंत आपल्याला हे खाते मिळणार नाही, तोपर्यंत आपण मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार नाही असे थेट त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. सी.पी. पाटील हे मात्र सार्वजनिक बांधकाम खाते सोडायला तयार नाहीत, पाटील यांनी दिल्लीला जाऊन सांसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली आणि आपल्या खात्यात फेरबदल करू नये, अशी मागणी त्यांच्याकडे केली. येदियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात असलेले माजी मंत्री सी.पी. योगेश्वर आणि रमेश जारकीहोळी हे सुद्धा बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. यासाठी ते पक्षश्रेष्ठीवर दबाव आणत आहेत.

    We did it Two ministers to resign BJPs troubles increase in Karnataka