रेल्वे बोर्डाचा इशारा जेथे विरोध, तेथे बुलेट ट्रेन नाही

विकास तेव्हाच शक्‍य आहे, जेव्हा केंद्र सरकारला राज्यांचे सहकार्य मिळेल. भाजपाशासित राज्य सरकारे केंद्र सरकारचे निर्णय सहज लागू करतात, परंतु इतर राज्यांमध्ये या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक अडचणी येत असतात.

जर महाराष्ट्र सरकारने भूमी अधिग्रहण कायदा लागू करण्यासाठी मदत केली नाही तर राज्यात बुलेट ट्रेन दुसर्‍या टप्प्यात धावू शकणार नाही. पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन अहमदाबाद ते वापी या ३२५ किलोमीटर ट्रॅकवर सुरू करता येऊ शकेल. भूमी अधिग्रहणाला मंजुरी मिळाली तर दुसऱ्या टप्प्यात वापी ते बांद्रा दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्यात येईल. ४ महिन्यात भूमी अधिग्रहण करण्यात येईल, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ४३२ हेक्‍टर जमिनीपैकी केवळ ९७ हेक्‍टर जमिनीचेच अधिग्रहण करण्यात आलेले आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीपैकी ही जमीन केवळ २२ टक्के आहे. दादर आणि नगरहवेलीमध्ये ८ हेक्‍टर जमिनीपैकी ७ हेक्‍टर जमिनीचे अधिग्रहण झालेले आहे. गुजरातमध्ये भूमी अधिग्रहणाचे काम वेगाने सुरू आहे. तेथे ९५६ हेक्‍टर जमिनीपैकी ८२५ हेक्‍टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

या प्रकल्पासाठी लागणाऱ्या गुजरातमधील जमिनीपैकी ९० टक्के जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून तेथे जमिनीवरील कामासाठी टेंडरही काढण्यात आले आहे. महाराष्ट्रात मात्र शेतकरी त्यांची सुपीक जमीन देण्यास विरोध करीत आहेत. काही शेतकरी जमिनीची जास्त किंमत मागत आहेत. बुलेट ट्रेनच्या व्यावहारिकतेवरच शंका निर्माण होत आहेत. बुलेट ट्रेन आणि विमानाचे भाडे जर सारखेच असेल तर लोक बुलेट ट्रेनने प्रवास करण्यापेक्षा विमानाने प्रवास करण्याला प्राधान्य देईल. काही जणांचे असेही म्हणणे आहे की, बुलेट ट्रेनसाठी प्रवासीच मिळणार नाही. तेजससारख्या ट्रेनलासुद्धा प्रवाशांची वानवा आहे.

या गाडीलाही पुरेसे प्रवासी मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये बुलेट ट्रेनसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी ठरेल का? याबाबत अनेक प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. एखाद्यावेळी बुलेट ट्रेनने प्रवास करणे ठीक आहे, परंतु या गाडीने वारंवार प्रवास करणे परवडण्यासारखे नाही. अगोदरच जर वेगवान गाड्या सुरू आहे तर पुन्हा बुलेट ट्रेनची काय आवश्यकता आहे ? रेल्वे बोर्डानेही इशारा दिला आहे की, जेथे या रेल्वेगाडीला विरोध होईल, तेथे ही गाडी चालविण्यात येणार नाही.