दिवाळीच्या सणात फुलांचे भाव कोसळले! फुलं स्वस्त असल्यानं, फुल बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी

    मुंबई : ऐन दिवाळीच्या सणात फुलांचे भाव गडगडले आहेत, त्यामुळं पूजेसाठी फुलं खरेदी करण्यासाठी फुल बाजारात लोकांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला फुलांच्या मागणीत वाढ झाली आणि फुलांना चांगला भाव मिळाला. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळाला. दिवाळीतही फुलांना चांगला भाव मिळेल या उद्देशाने लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी झेंडूसह विविध फुलांची मोठय़ा प्रमाणावर मुंबईत आवक झाली. परिणामी झेंडू, शेवंती आदी महत्त्वाच्या फुलांचे भाव गडगडले. गेल्या वर्षी दिवाळीत झेंडू १०० रुपये प्रतिकिलोने विकला गेला होता. यंदा घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा झेंडू ४० ते ५०, तर लहान आकाराचा झेंडू ३० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. एरव्ही शंभरी पार असणारी शेवंती बुधवारी ४० रुपये प्रतिकिलोने विकली गेली. फुलांच्या किंमतीत घट झाल्यामुळं ग्राहकांनी गर्दी केली आहे, तर व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.

    दसरा तसेच दिवाळीत फुलांच्या मागणी मोठी मागणी असते. मागील वर्षी दिवाळीत १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने झेंडूची विक्री झाली होती. मात्र बुधवारी दर गडगडल्याने झेंडू ३० रुपये प्रतिकिलो विकला जात होता. राज्यभरात फुलांचे मुबलक पीक आल्याने आवक वाढली असून, झेंडूसह सर्वच फुलांचे दर कोसळल्याने ऐन दिवाळीत व्यापाऱ्यांना काळजीने ग्रासले आहेत. झेंडू ३० रुपये, तर शेवंती ४० रुपये प्रतिकिलो

    सणासुदीच्या काळात दादर स्थानकाबाहेरील किरकोळ फूलबाजारात नागरिकांची गर्दी पाहयाला मिळते. फुले, हार, तोरण, गजरे, आंब्याचे डहाळ खरेदीसाठी झुंबड उडाली होती. किरकोळ बाजारात झेंडू ८० ते १०० रुपये प्रतिकिलोने विकला जाता होता. मुंबई बाहेरून येणाऱ्या महिलांनी दादरच्या गल्ल्या व्यापून टाकल्या होत्या. फुले, तांदळाच्या लोंब्या, तोरण याने रस्ते सजले होते तर, कार्यालयातून घरी परतणारे खरेदीत दंग झाले. ‘फुलांना दर कमी मिळाल्याने व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. पण शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. पीक जास्त आल्याने नफ्याचे गणित बिघडले असून त्याच्या फटका बसत असून, नुकसान होत आहे असं दादर फूल बाजारातील व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.